फलटण प्रतिनिधी : एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. या क्षेत्रात भारतीय तरुणांना मोठी संधी आहे. सध्या अनेक देशात जन्मदर घसरला आहे त्यामुळे त्या देशातील तरुणांची संख्या कमी असल्याने विविध देशात पुरवले जाणारे मनुष्यबळ भारतातून पुरवले जाते. सध्या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये 40% भारतीय आहेत. अमेरिकेसह जगातील विविध देशात भारतीय तरुणांना एआय क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यामुळे भविष्यात भारतामध्ये जग चालविण्याची क्षमता असल्याचे उद्गार फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी काढले.
ते छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तीमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (CSMS-DEEP) च्या लाभार्थीकरिता सर सेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा योजना अंतर्गत विध्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, धैर्य फौंडेशनचे अध्यक्ष सचिन मोरे, डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी.च्या संस्थापक सौ. मनीषा कांबळे, संचालक शेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध देशातील तरुणांची संख्या कमी असल्याने एआयवर भर दिला जात आहे. मात्र ते चालविण्याची संधी भारतीय तरुणांना आहे.भविष्यात अनेक देशात भारतीय तरुण दिसतील त्यामुळेच भारत जगावर राज्य करेल ते तरुणांच्या हातात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असल्याचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी निदर्शनास आणून दिले. नवीन शिक्षण प्रणाली भारताने स्वीकारले असून पुढील शंभर वर्षाचे नियोजन केले आहे. शहरातील शाळा स्मार्ट होत असून ग्रामीण भागात हा बदल बाकी आहे. त्यामुळे संगणकीकरणाची संधी उपलब्ध असल्याचे ढोले यांनी सांगितले.
तुमचे कुटुंब, तुमची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा तुमचे सातत्याने कष्ट किती आहेत यावर यश अवलंबून असल्याचे सचिन ढोले म्हणाले. विद्यार्थी दशेमध्ये स्वतःमधील उणिवा शोधून त्यावर काम केले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी दिवसाच्या वेळेचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे स्वतःच्या अनुभवातून त्यांनी सांगितले. शिक्षण हे भविष्य घडविण्याचे क्षमता असलेले क्षेत्र आहे. त्यासाठी सातत्य ठेवावे असे ढोले म्हणाले. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत असून त्याकरिता विविध कामासाठी संधी असल्याचे यावेळी सचिन ढोले यांनी सांगितले.
मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी शैक्षणिक धोरणामधील बदलाचे स्वागत केले. तर भविष्यात अकॅडमिक शिक्षणाला महत्त्व येणार असल्याचे सांगून ए आय तंत्रज्ञानाकरिता खाजगी संस्थांना मोठी संधी असल्याचे सांगितले.
धैर्य फौंडेशनचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी आपल्या भाषणात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आयटीआय क्षेत्रामध्ये काम करत असतानाच स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता वाचन गरजेच असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आयुष्यातील ध्येय प्राप्तीकडे लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. हे गेली 24 वर्ष उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगितले.
डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी.च्या संस्थापक संचालक शेखर कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा शिवराज्यअभिषेक दिना निमित सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा योजनेची माहिती दिली.
श्रद्धा ज्ञानेश्वर शिंदे - वाखरी, श्रावनी जीवन निकम - फलटण, गायत्री कमलाकर भोईटे - राजाळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा शिवराज्यअभिषेक दिना निमित सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थांनी स्वकमाई केली आहे अशा विद्यार्थांच्या पालकांना मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये भेटवस्तू, प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. सूत्रसंचालन श्रावणी निकम यांनीकेले तर आभार डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय. टी.च्या संस्थापक सौ. मनीषा कांबळे यांनी मानले.
रोबोट वर प्रशिक्षण देणारी जिल्यातील पहिली संस्था
डॉ. बी.आर.आंबेडकर आयआयटी मध्ये विद्यार्थ्यांना रोबोटच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. रोबोट वर प्रशिक्षण देणारी सातारा जिल्ह्यातील ही पहिली संस्था आहे. यावेळी रोबोटची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व उपस्थित मान्यवरांना संस्थेच्या संस्थापिका सौ मनीषा मॅडम यांनी दिली. तसेच मराठा कुणबी समाजातील मुलांना सध्या प्रवेश देणे सुरु आहे. या मोफत प्रशिक्षणाचा लाभ पदवीधारक मुला मुलींनी घ्यावा.