फलटण प्रतिनिधी:-दहा दिवस भक्तीभावाने बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर तालुक्यांत सर्वत्र गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळाला आहे.गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर याच्या गजरात फलटण येथील सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन भक्तीभावाने करण्यात आले.
पाऊस पडेल या आशेवर फलटण शहर व तालुक्यात बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं होत. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. शेवटच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले होते.दुपारी व रात्री पावसाने हजेरी लावल्याने विसर्जनासाठी आलेल्या भक्तांची तारांबळ उडाली होती काही कालावधी नंतर पावसाने उसंत घेतल्या नंतर पुन्हा एकदा विसर्जनाला सुरुवात झाली होती.
फलटण शहरातील गणेशाची विसर्जन मिरवणूक स्थानिक गणेशभक्तानी पारंपारीक वाद्य, वाजंत्रीच्या तालावर काढली होती. त्यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. शहरातील नीरा उजवा कालवा,नगरपालिकेच्या हौदात, कासारबावड़ी विहिरीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कॅनॉल परिसरात मोठ्या गणपती मूर्ती विसर्जन करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. फलटण नगरपालिकेने सुविधा उपलब्ध करून दिल्याने यावेळी भक्तानी समाधान व्यक्त केले. नगर परिषद तर्फे विविध ठिकाणी श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी वाहणे उपलब्ध करण्यात आली होती. बंद पडलेली सीसीटिव्ही कॅमेरे यावेळी सुरू करण्यात आले होते. नाना पाटील चौक येथे निरा उजवा कालवा पूल याठिकाणी आग्निशामक, क्रेन, तसेच ॲम्बुलन्स याची सोय करण्यात आली होती.शहर परिसरातील आणि तालुक्यातील गणेश विसर्जनही डॉल्बी, पारंपरिक वाद्य,ढोल लेजिम,टाळ- मृदुंगच्या गजरात भक्तीभावाने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
फलटण शहरातील शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ, रविवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ, उमाजी नाईक गणेशोत्सव मंडळ,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक,अमरज्योति गणेशोत्सव मंडळ, स्वामी विवेकनंद गणेशोत्सव मंडळ, मलठन गणेशोत्सव मंडळ,नवचैतन्य गणेशोत्सव मंडळ, मारवाड़पेठ गणेशोत्सव मंडळ,झुंझार गणेशोत्सव मंडळ, दगडीचाळ गणेशोत्सव मंडळ, जयहिंद गणेशोत्सव मंडळ,नेहरु गणेशोत्सव मंडळ आदी मंडळानी मिरवणुकीत आकर्षक देखावे सादर केले होते देखावे बघायला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
श्रीराम चौकी फलटण येथे परंपरे प्रमाणे प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत मुख्यधिकारी संजय गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले. फलटण नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी स्वागत मंडप उभारून श्रीराम चौकी फलटण येथे गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी स्टेज व मंडप उभारण्यात आला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांच्या मार्गर्शनाखाली गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मिरवणूक मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी २५ कर्मचारी आणि दोन अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर अडथळा ठरणाऱ्या वीज केबल व वाहिन्या त्या बाजूला करण्यात आल्या होत्या.