हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने करण्याची परंपरा आहे. विघ्न, संकटांचा नाश करणारी देवता म्हणून गणरायाला ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
या दिवसाची भाविक वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात घराघरांत तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे? गणेश पूजा कधी करावी? शुभ मुहूर्त काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया
गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सवाची सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याचे भाविक दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना वाजतगाजत आपल्या घरी आणतात. विधीनुसार बाप्पाची मनोभावे पूजा सेवा करतात.
गणेश चतुर्थी पूजनाचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार यंदा भगवान गणपती बाप्पाच्या मध्यान्ह पूजेचा शुभ मुहूर्त 27 ऑगस्ट 2025 बुधवार सकाळी 11.05 वाजेपासून ते दुपारी 01.40 वाजेदरम्यान असणार आहे. भाविकांना बाप्पाच्या पूजेसाठी तब्बल अडीच तासांचा कालावधी मिळणार आहे.
गणपतीची पूजा कशी करावी?
हिंदू मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे.
विधीनुसार गणेश चतुर्थीचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा करावी.
घराच्या ईशान्य दिशेला चौरंगावर पिवळ्या रंगाचे कापड पसरुन त्यावर गणेश मूर्ती स्थापित करावी.
यानंतर गणेश मूर्तीवर गंगाजल शिंपडावे, मूर्तीला स्नान घालावे.
बाप्पाच्या मूर्तीला कुंकवाचा टिळा लावून विधीवत पूजा करावी.
पूजेसाठी बाप्पाला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा. उदाहरणार्थ दुर्वा, लाडू, मोदक, श्रीफळ इत्यादी गोष्टी बाप्पाला अर्पण कराव्या.
गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.
गणरायाची आरती करावी.
गणेश चतुर्थीच्या संध्याकाळी देखील बाप्पाची विधीवत पूजा करावी.
गणपती विसर्जन कधी आहे?
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांनंतर भाविक गणपती बाप्पाला निरोप देतात. बाप्पाची विधीवत पूजा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन केले जाते.
पंचांगानुसार यंदा गणपती विसर्जन 6 सप्टेंबर रोजी आहे.
(धैर्य टाईम्स या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)