Phaltan news - दररोज शेकडो विद्यार्थी बसने फलटण येथे शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत एसटी बस च्या फेऱ्या नसल्याने शेकडो विध्यार्थी तासनतास बस थांब्यावर ताटकळत उभे असतात. अनेक वेळा शाळा महाविद्यालयामध्ये वेळेत न पोचल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. एसटी बसची वाट पाहत विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट होत असून फलटण पूर्व भागातील बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या कडून होऊ लागली आहे.
फलटणच्या पूर्व भागातून विडणी, पिंपरद, निंबळक, वाजेगाव, राजुरी, बरड, आसू, पवारवाडी यासह विविध भागातून दररोज शेकडो विद्यार्थी फलटणला शाळा महाविद्यालयीन शिक्षणाकरता येत असतात. मात्र या भागात जाणाऱ्या व या भागातून सुटणाऱ्या एसटी बस शाळा व महाविद्यालयीन वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन एसटी बसचे वेळापत्रक तयार कराव्या अशी मागणी आता विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
राजुरी येथून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मुक्कामी गाडीची सोय करावी अशी मागणी होत आहे. तर पंढरपूर कडे जाणाऱ्या लांब पडल्याच्या गाड्या राजुरी या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने बरड पर्यंतचा प्रवास करून पुढे फलटणला यावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी धैर्य टाईम्सशी बोलताना सांगितले.
शाळा - महाविद्यालयामध्ये वेळेत पोहोचण्याकरिता विध्यार्थी खाजगी वाहणांचा आधार घेत आहेत त्यामुळे एसटी बसचा मासिक पासही काढुनही आर्थिक नुकसान होत आहे तर खाजगी वाहनांचा प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये चिंता व्यक्त होत आहे.