फलटण प्रतिनिधी -
लोकसभा 2024 च्या निवडणुकीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले आहे. माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करीत अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हे बहुमताने निवडून लोकसभेत गेले. माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांना भरघोस मतदान झाले. निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत अनेक आश्वासने देणारे खासदार मोहिते - पाटील निवडणुकीच्या विजया नंतर पुन्हा फलटणला फिरकलेच नाहीत. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते - पाटील हे मिस्टर इंडिया या हिंदी चित्रपटातील अनिल कपूरच्या भूमिकेत असल्याची चर्चा सध्या फलटणमध्ये सुरू आहे. तर मोहिते - पाटील यांना मतदान देऊन फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मतदारांना पश्चातापाची वेळ आल्याची चर्चा आता फलटण मध्ये चांगलीच रंगू लागली आहे.
विकासाच्या निधी बाबत फलटण पोरकाच ?
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आश्वासनांचे गाजर दाखवणारे धैर्यशील मोहिते - पाटील यांनी फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांची घोर निराशा केली असल्याच्या चर्चा फलटणध्ये चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत. निवडणूक काळात अनेक कार्यकर्त्यांच्या हातात हात घालून फिरणारे मोहिते - पाटील आता केवळ आपल्या पाहुण्यारावळ्यांच्याकडेच येतात. मात्र फलटणच्या विकासाचं काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. वर्षभरात किती निधी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात खासदार मोहिते - पाटील यांनी आणला हा एक यक्ष प्रश्न बनून राहिला असून विकासाच्या निधी बाबत फलटण पोरकाच राहिला असल्याच्या भावना आता जन- माणसात उमठू लागल्या आहेत.
फलटणच्या विकासाचा कोणता निधी खासदारांनी आणला हे एकदा जाहीर करावे
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या एक वर्षात फलटणच्या विकासाचा कोणता निधी आणला हे एकदा त्यांनी जाहीर करावे अशी अपेक्षा मतदार करीत आहेत. पाटलांना केलेले मतदान हे आपल्या आयुष्यातील खूप मोठी चूक असल्याचे आता फलटणकर बोलू लागले आहेत.
विकासाचा महामेरू रोखला गेला ?
माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून लोणंद - फलटण रेल्वे सुरु झाल्याचे सर्वश्रुत आहे. शेतीच्या पाण्यासंबंधी महत्वपूर्ण निर्णय ही घेतले गेले. मात्र 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर माढ्याचा कारभारी मात्र फलटणकडे विकासाच्या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. फलटणच्या विकासाचा महामेरू खासदार मोहिते पाटलांनी रोखू नये एवढी मापक अपेक्षा फलटणकरांनी व्यक्त केली आहे.