फलटण प्रतिनिधी -
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानच्या अंमलबजावणीसाठी तालुका व ग्रामस्तरावर संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करुन अभियानाची उद्दिष्टे व जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवशीय कार्यशाळा बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी तालुकास्तरीय सर्व वरिष्ठ अधिकारी व पर्यवेक्षिय अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच/सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या वतीने देण्यात आली.
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थाचे मोठे योगदान असुन त्रिस्तरीय पंचायतराज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व योजनांची प्रभावी व जलदगतीने करुन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविणे व लोकांचे जीवनमान उंचावणे व लोकचळवळ उभारणे ग्रामीण नागरिकांना सुलभ रितीने सेवा देणे थोर संत परंपरेचा सहभाग घेणे आरोग्य, शिक्षण, उपजिवीका या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतचा सहभाग वाढवुन पंचायत राज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतुन मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राज्य शासनाने जाहीर केले आहे. अभियानात प्रामुख्याने सुशासनयुक्त पंचायत (लोकाभिमुख सशक्त पंचायत प्रशासन), सक्षम पंचायत (स्वनिधी, सीएस आर लोकवर्गणीतुन पंचायतराज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे), जलसमृध्द व स्वच्छ हरितगाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजिवीका व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातुन लोकचळवळ निर्माण करणे हा उद्देश असणार आहे.
१७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ असा अभियानाचा कालावधी असुन १७ सप्टेंबर या दिनांकाला या अभियानाची सुरूवात ग्रामसभा घेऊन सुरू होणार आहे.