फलटण प्रतिनिधी -
दिव्यांग व्यक्तींच्या हक्काचे अनुदान असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील दिव्यांग असल्याचे नावाखाली इतर कोणी या योजनांचा लाभ घेत असेल तर ही शासनाची फसवणूक आहे अशा व्यक्तींवर अधिकारी वर्गानी लक्ष घालून तत्काळ कारवाई अशा सूचना देतानाच दिव्यांग व्यक्तींच्या विकासाकरिता राज्यातील महायुती सरकार पूर्ण ताकतीने पाठीशी उभे आहे असे आश्वासन आमदार सचिन पाटील यांनी दिले. केंद्र शासनाच्या एडीएफ योजने अंतर्गत अलिमको या शासनमान्य संचलित एस.आर. ट्रस्ट संस्था रतलाम ( मध्यप्रदेश) व पंचायत समिती फलटण यांच्या विद्यमाने पंचायत समिती फलटण येथे तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसविणे शिबिर पार पडले याप्रसंगी आमदार सचिन पाटील बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, माजी नगरसेवक सुदामराव मांढरे, महाराष्ट्र दिव्यांग संघर्ष समितीचे सचिव कृष्णा पवार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष साताराचे शिवालय वारुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग अनुदान योजने अंतर्गत रुपये १५००/- प्रत्येक महिन्यासाठी त्यांचे बँक खातेवर ऑनलाईन द्वारे दिले जाते त्यामध्ये नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अनुदान मध्ये प्रत्येक महिन्यांसाठी रुपये १०००/- इतके वाढवून आता या महिन्यांपासून दिव्यांग व्यक्तींसाठी रुपये २५००/- इतके अनुदान मिळणार आहे. लोक प्रतिनिधी म्हणून दिव्यांग व्यक्तींचा भाऊ बनून त्यांच्या अडी अडचणी सरकार दरबारी मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी विक्रम भोसले, भाजप तालुकाध्यक्ष अमित रणवरे, अळजापूर चे सरपंच शुभम नलवडे, नितीन गोडसे, सोमनाथ यजगर,सागर जाधव आदींसह दिव्यांग व्यक्ती बहुसंख्येने उपस्थित होते.