फलटण शहरात सध्यस्थितीत डेंग्यू व तत्सम आजाराची रुग्ण संख्या वाढत असून कोरोना काळात ज्या प्रमाणे रुग्णालये भरली होती त्याप्रमाणे डेंग्यू रुग्ण संख्येने शहरातील रुग्णालयात गर्दी वाढत आहे. नगर परिषद प्रशासनाने यावर कोणत्याही प्रकारची ठोस उपाय योजना न केल्याने अखेर फलटण शहर व तालुका पत्रकारांनी नाईलाजास्तव मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या निवास्थानासमोर मंगळवार दि. २० रोजी सकाळी ११ वाजता लाक्षणिक उपोषण सुरु केले होते, लेखी आश्वासन आणि प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या मध्यस्थीनंतर लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले.
फलटण शहरात डेंग्यूची साथ मोठया प्रमाणावर वाढत असून अनेक सामाजिक संघटना व पक्षांनी आपापल्या पद्धतीने आंदोलन करुनही शहरात नगर परिषदेने कोणत्याही प्रकारची ठोस उपाय योजना न केल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कागदोपत्री घोडे नाचवत नगर परिषद केवळ दिखावू काम करत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
शहरातील पत्रकार कॉलनी लगत असलेली पाण्याची जुनी टाकी पाडून त्याठिकाणी नवीन टाकी उभारण्यासाठी मोठा खड्डा करण्यात आला असून सुमारे ८/१० महिन्यांपासून हे काम बंद असल्याने या खड्ड्यात सद्याच्या संतत धार पावसाने पाणी साठून राहिले आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून परिसरात दलदल पसरली असल्याने लगत राहणाऱ्या कुटुंबांना याचा त्रास होत आहे.
याबाबत जिल्हाधिकारी सुचेश जयवंशी यांच्यासह महसूल व नगर परिषद प्रशासन यांच्याकडे तक्रारी करुनही सदरचा खड्डा बुजवून डांस निर्मितीचे हे केंद्र बंद करावे, परिसराची स्वच्छता करावी यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आली नाही. त्याशिवाय शहरातील कचरा नियमीत उचलला जात नाही, शहर स्वछतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, दुर्गंधी सुटे पर्यंत कचरा उचलला जात नसल्याने शहरात सध्याच्या संतत धार पावसाने हवामान आणखीनच खराब होत असल्याने त्याबाबत योग्य उपाय योजना तातडीने करण्याची आवश्यकता पत्रकारांनी प्रांताधिकारी व प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना पटवून दिल्यानंतर त्यांनी आगामी १५ दिवसात याबाबत ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता, सुभाषराव भांबुरे, स. रा. मोहिते, दादासाहेब चोरमले, यशवंत खलाटे, युवराज पवार, सतीश जंगम, नसीर शिकलगार, शक्ती भोसले, वैभव गावडे, विक्रम चोरमले, विजय भिसे, दीपक मदने, सुमित चोरमले, अविनाश जाधव, उमेश गार्डे, अभिजित सरगर, काकासाहेब खराडे, विकास शिंदे, अनमोल जगताप, सचिन मोरे, संदीप जाधव, रोहित वाकडे, प्रसन्न रुद्रभटे, शेखर जगताप, प्रशांत बावळे, प्रभाकर कर्चे, राजेंद्र गोडसे आदी पत्रकार उपस्थित होते. याचबरोबर अनेक सामाजिक संघटना व पक्षांनी आंदोलनस्थळी भेट देत लाक्षणिक उपोषणास पाठींबा दिला होता. यामध्ये सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी दूरध्वनी द्वारे तर समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, संजय गायकवाड, अरुण खरात, अमिरभाई शेख, प्रताप चव्हाण, धैर्यशील लोखंडे, विरसेन सोनवणे, अनिकेत नाळे, बबलू मोमीन, सनी काकडे, मंगेश आवळे, महादेव गायकवाड, दीपक देशमुख यांनी आंदोलन स्थळी पाठिंबा देत उपस्थिती दर्शविली होती.