वारूंजी, ता. येथे खासगी व्यवहारातून आर्किटेक्टला मारहाण झाल्याप्रकरणी शनिवारी 20 रोजी सात जणांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. याप्रकरणात नितीन छाजेड यांना कोणतीही मारहाण झालेली नाही.
कराड : वारूंजी, ता. येथे खासगी व्यवहारातून आर्किटेक्टला मारहाण झाल्याप्रकरणी शनिवारी 20 रोजी सात जणांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. याप्रकरणात नितीन छाजेड यांना कोणतीही मारहाण झालेली नाही. याउलट त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा जितेंद्र भंडारी यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
नामदेव काशिनाथ पाटील, मुकुंद काशिनाथ पाटील, बाळासो काशिनाथ पाटील, राजेंद्र काकासो पाटील, महेश उत्तम पाटील, अभिजीत पांडुरंग भंडलकर, तानाजी उत्तम सुर्वे सर्व रा. वारूंजी, ता. कराड अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र भंडारी हे आर्किटेक्ट असून त्यांनी नामदेव पाटील यांच्या सुमारे दहा ते बारा प्रोजेक्टवर काम केले. तसेच त्यांच्या गावातील ‘कुसुमावली वाडा’ या घराचे कामही भंडारी यांनी केले. 2018 साली सत्यजित ग्रुपतर्फे हॉटेल, मॉलसह अपार्टमेंटचे काम करायचे असल्यामुळे सत्यजित ग्रुप आणि भंडारी यांच्या पार्श्व आर्किटेक्टमध्ये करार झाला. तसेच कामही सुरू झाले. मात्र, 2020 मध्ये हे काम बाळासाहेब पाटील यांचा मुलगा नयन यांच्यामार्फत केले जाणार असल्याचे सत्यजित ग्रुपकडून सांगण्यात आले. तसेच संबंधितांनी तुमचे कसलेही पैसे आम्ही देणे लागत नाही, असे भंडारी यांना ई मेलद्वारे कळविले. 16 लाख 25 हजार रुपये येणे बाकी असल्यामुळे भंडारी यांनी याबाबत संबंधितांना नोटीस पाठविली. मात्र, त्यांनी ती स्विकारली नाही.
दरम्यान, याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न गत काही दिवसांपासून सुरू होता. बुधवारी या व्यवहाराबाबत मध्यस्थी करण्यासाठी वारुंजी फाट्यावर सत्यजित पतसंस्थेच्या कार्यालयात बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी जितेंद्र भंडारी, त्यांचा भाऊ संजय व मित्र नितीन छाजेड हे तिघेजण सत्यजित पतसंस्थेत गेले. बैठक सुरू असताना संजय भंडारी यांनी नामदेव पाटील यांना तुम्ही आम्हाला दहा लाख रुपये दिले असल्याचे सांगीतले. मात्र, तेरा लाख रुपये दिले आहेत, असे म्हणून नामदेव पाटील यांच्यासह इतरांनी जितेंद्र भंडारी, संजय भंडारी यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी खुर्च्यांनी मारहाण केली होती.
याप्रकरणी भंडारी यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.