फलटण प्रतिनिधी -
साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो या आरशाद्वारे साहित्यिक आपल्या साहित्यातून समाजाच्या वेदना,दुःख, आनंद, प्रेम, जिव्हाळा तसेच विविध प्रश्न यावर भाष्य करत असतो. त्यामुळे समाज जागृती होऊन, समाजाच्या व्यथा समाजा समोर येतात व त्याला वाचा फोडली जाते. अशा साहित्यिकांची पहिली साहित्यकृती आपल्या अपत्या प्रमाणे असते. जेव्हा पाहिल्या साहित्यकृतीचा जन्म होतो त्याचा आनंद अवर्णनीय असतो असे मत ज्येष्ठ लेखिका सौ सुलेखा शिंदे यांनी व्यक्त केले. त्या साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, वन विभाग फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण यांनी नाना नानी पार्क फलटण येथे आयोजित केलेल्या साहित्यिक संवाद या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, प्रा. विक्रम आपटे, प्रा.डॉ. सुधीर इंगळे, ताराचंद्र आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ सुलेखा शिंदे पुढे म्हणाल्या की, साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे लेखकांनी लिखाण करताना सजग राहून संवेदनशील मनाने लिखाण करून जे आपल्या आसपास घडते यावर स्पष्टपणे भाष्य केले पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी लघु कथा व पहिली साहित्यकृती तसेच साखरशाळा व त्याविषयी त्यांचे साहित्यिक अनुभव कथन केले, प्रा. विक्रम आपटे यांनी पाहिले पुस्तक एवढ तेवढ चालायच याच्या निर्मितीची गमतीशीर गोष्ट सांगितली. डॉ सुधीर इंगळे यांनी दैनिक शिवसंदेश यामध्ये छापून आलेली आमच्या प्राणाहून प्यारा ही पहिली कविता सादर करून राष्ट्रप्रेम जागृत केले. श्रीमती आशा दळवी यांनी इयत्ता दहावीत असताना लिहलेली कथा व कविता सादर केली. कु. दामिनी ठिगळे यांनी सुखलेला गुलाब ही पहिली कविता सादर केली. सौ माया भगत यांनी पाऊस ही पहिली चारोळी पहिल्यांदाच सादर केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संयोजक, साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनचे अध्यक्ष साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी करून पहिल्यांदा कोरेगाव येथे कवी संमेलनात कविता सादर करण्याची संधी दिली नाही याचे दुःख मनात न ठेवता आपल्यासारख्या नव साहित्यिकांसाठी साहित्याचा मळा कसा निर्माण केला यावर सकारात्मक भाष्य केले. संयोजक रानकवी राहुल निकम यांनी लेक व बाप ही पहिली कविता भारदस्त आवाजात सादर करून सर्वांची मने जिंकली व सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रा. विक्रम आपटे यांनी आपला बंगला दान केल्याबद्दल त्यांचा सत्कार मेंढका हे पुस्तक देऊन करण्यात आला व अभिनंदन केले. सत्काराबद्दल त्यांनी आपले पहिले पुस्तक 'एवढ तेवढ चालायचच' सर्वाना भेट दिले. यावेळी सुरेश भगत, कु. माया इंगळे, सचिन शिंदे व साहित्यप्रेमी यांची प्रमुख उपस्थिती होती.