फलटण प्रतिनिधी :
आधुनिक शेती करीता ‘विडमॅट’चा उपयोग शेतकऱ्यांकरिता किती फायदेशीर आहे याचे प्रात्यक्षिक बारामती कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बिवी ता. फलटण येथे सादर केले. आधुनिक शेतीत तण नियंत्रणासाठी विडमॅटचा वापर कसा फायदेशीर ठरतो, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.
विडमॅट हे एक खास प्रकारचे मॅट असून ते जमिनीवर अंथरल्यास तणांना सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे तणांची वाढ थांबते. यामुळे पाणी, खते आणि मजुरीचा खर्च कमी होतो तसेच पिकाचे उत्पादनही वाढते याची माहिती कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिली.
विद्यार्थ्यांनी ड्रॅगनफ्रूट या पिकामध्ये विडमॅटच्या वापराचे फायदे प्रत्यक्ष दाखवले. विडमॅटचा वापर डाळिंब, सीताफळ, मिरची, टोमॅटो इ. पिकांवर करता येतो हे देखील सांगितले. शेतकऱ्यांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व विडमॅटचा वापर करण्यास उत्सुकता दाखवली.
या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कृषिदूत कार्तिक चौधरी, चारुदत्ता बाविस्कर,आर्यन चौधरी, कौस्तुभ शिपूरकर, साहिल भिकले, अनुष्क लोले, ऋषी पाठक व तुषार शिर्के यांनी शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि आधुनिक शेती पद्धतीची जाणीव करून दिली. शेतीमध्ये विज्ञानाचा वापर आवश्यक आहे, हे विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे दाखवून दिले. या प्रात्यक्षिकाबद्दल शेतकऱ्यांनी कृषी दुतांचे आभार व्यक्त केले.