खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. उशिरा पर्यंत खंडाळा, शिरवळ, बावडा व भादे गटाची मतमोजणी सुरु असून या चारही गटात राष्ट्रवादीने आघाडी मारली आहे.
वाई : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. उशिरा पर्यंत खंडाळा, शिरवळ, बावडा व भादे गटाची मतमोजणी सुरु असून या चारही गटात राष्ट्रवादीने आघाडी मारली आहे. ज्येष्ठ नेते व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष शंकरराव गाढवे व त्यांचे चिरंजीव व विद्यमान संचालक अनिरुद्ध गाढवे यांच्यासह संपूर्ण पॅनलचा पराभव झाला.
कारखान्याची निवडणूक दोन्ही पॅनलनी प्रतिष्ठेची केली होती. स्थानिक कारखाना व त्यावरील कर्ज, तालुक्याचा स्वाभीमान जागा करीत प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारीही वाढली होती. कारखाना सुरु झाल्यानंतर नंतर पाच वर्षांनी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत संस्थापकांचा पराभव झाला. कारखान्याची पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने मतदारांचा अंदाज कोणालाच नव्हता. प्रचाराची फार मोठी आणि सूत्रबद्ध रीतीने मकरंद पाटील व सहकाऱ्यांनी प्रचाराची यंत्रणा राबविली. प्रत्यक्ष गाठीभेटींवरही भर देण्यात आला होता.
खंडाळा कारखान्यासाठी रविवारी (दि १७)रोजी ७९.८६ टक्के मतदान झाले होते. आज सकाळ पासून खंडाळा येथे मतमोजणी झाली. कारखान्याचे अध्यक्ष शंकराव गाढवे यांचे योगदान पाहता गाढवे गटाला हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. सकाळी मतमोजणीचे कल यायला सुरुवात झाली तेव्हापासून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तर निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. तर खंडाळा, शिरवळ व बावडा गटातील विजय झालेल्या उमेदवारांनी आपापल्या गावी जाऊन गुलालाची उधळण करून जल्लोष केला.