फलटण प्रतिनिधि -
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यकाल प्रसिद्ध केला असून काल दुपार पासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. फलटण कोरेगाव विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदार संघात अतिशय उत्साहाने व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडेल. लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पत्रकार परिषदेत केले. येणाऱ्या विधानसभा निवडणूकी संदर्भात माहिती देण्याकरिता फलटण येथील निवडणूक कक्ष येथे पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सचिन ढोले म्हणाले, दिनांक २२ ऑक्टोबर पासून २९ ऑक्टोबर रोजी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दिनांक ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल तर दि ४ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील आणि दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल दिनांक २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येईल अशी माहिती यावेळी ढोले यांनी दिली.
या निवडणुकीत जेष्ठ नागरिकांसाठी घरून मतदान करता येणार आहे, यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून फॉर्म १२ डी भरून घेतला जाईल यामध्ये दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिक यांचे गृहभेटीद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळी उमेदवार व अनुमोदक यासह एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश मिळणार असून इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे यावेळी ढोले यांनी निदर्शनास आणून दिले.
निवडणूक नामनिर्देशन कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात फक्त तीनच वाहनांना प्रवेश देण्यात येईल असेही यावेळी सचिन ढोले यांनी सांगितले.
फलटण -कोरेगाव हा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने अनुसूचित जातीचे महाराष्ट्र राज्याच्या अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नसून उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते आवश्यक आहे याचा खर्च तीन टप्प्यात सादर करायचा असून चाळीस लाख रुपये खर्चाची मर्यादा असणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
फलटण कोरेगाव २५५
एकूण मतदार ३३८४६४
पुरुष मतदार। १७२४५९
स्त्री मतदार। १६५९९१
इतर मतदार। १४
सैनिक मतदार ९५६
दिव्यांग मतदार २१६०
लोकसभा निवणुकीपेक्षा यावेळी लिंग गुणोत्तरात वाढ होऊन ते ९६२ इतके झाले आहे
मतदान केंद्रे
एकूण ३५५ मतदान केंद्र
शहरी मतदान केंद्र ४७
ग्रामिण मतदान केंद्र ३०८
युवा मतदान केंद्र
गोखळी व विडणी