कराड तालुक्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यात येणार आहेत.
कराड : कराड तालुक्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यात येणार आहेत. ही साधने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता मंत्रालयाच्या ADIP (Scheme of Assistance to Disable Persons for purchase/fitting of Aids Appliances) व राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) या योजनेद्वारे मिळणार असून त्याचा तालुक्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना गरजेनुसार व अलिम्को कानपूर, उत्तरप्रदेश येथील तज्ञांच्या सल्ल्याने तीन चाकी सायकल, व्हील चेअर, मोटारइज्ड ट्रायसायकल, कॅलिपर्स, कुबड्या, कृत्रीम हात-पाय, श्रवणयंत्रे, विविध प्रकारच्या काठया, ब्रेल कीटस्, एम.आर.किटस्, नंबरचा चष्मा, स्मार्ट फोन आदी. कृत्रीम अंग व साधने जिल्हा प्रशासन, सातारा आणि जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त प्रयत्नाने मिळवून देण्यात येणार आहेत.
ही कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करुन घेण्यासाठी संबंधीत लाभार्थ्यांने नागरी सुविधा केंद्राकडे नाव नोंदणी करुन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी दिव्यांगाकरिता सिव्हील सर्जन यांचा दिव्यांगत्वाचा वैद्यकीय दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/तलाठी/नगरसेवक), वार्षिक उत्पन्न रु. 1 लाख 80 हजार आणि दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/तलाठी/नगरसेवक), दोन पासपोर्ट साईज फोटो, वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त, वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार पर्यंतच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
तसेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन टप्प्यात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला टप्यात कराड तालुक्यातील दिव्यांगासाठी 17 डिसेंबर 2021 रोजी आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 18 डिसेंबर 2021 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 28 जानेवारी 2022 पासून जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये मोजमाप शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.