फलटण प्रतिनिधी:- दिवाळीच्या सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठांमध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण होऊ लागले आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. दरवर्षी वाढत जाणाऱ्या महागाईचा परिणाम यंदाही दिवाळीच्या खरेदीवर जाणवत असला तरी, आठवड्याअखेरीस बाजारात खरेदीसाठी गर्दी होईल, असा विश्वास अनेक विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळी आठवड्यावर आली की, अंगणात दररोज रांगोळी काढण्याची परंपरा असते त्यानुसार अंगणे आकर्षक अशा रांगोळ्यांनी सजू लागल्याने दिवाळीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे फलटण शहरातील मुख्य बाजारपेठेत दुकानांमध्ये खास दिवाळीसाठी म्हणून आलेल्या वस्तुंनी दुकाने भरून गेली आहेत. अनेक विक्रेत्यांनी दिवाळीसाठी लागणारी रांगोळी, रंग, रांगोळीची पुस्तके, रांगोळीचे छाप, सुगंधी उटणे, पणत्या विक्रीसाठी आणल्या आहेत.पणत्या व आकाशकंदील यांना विशेष महत्त्व असते. यंदा बाजारात पणत्यांचे विविध प्रकार आले असून, त्यात पाण्यावर तरंगणारी कमळांच्या आकारातील पणत्या, हत्तीच्या पाठीवर दिवे अशा फॅन्सी पणत्यांची बाजारात चलती आहे. सेलवर चालणाऱ्या पणत्याही सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. रंगीबेरंगी पणत्यांपासून मातीच्या पणत्यांची भुरळ ग्राहकांना पडत आहे.
दिवाळीत प्रामुख्याने खरेदी होते ती कपड्यांची. त्यामुळे या काळात कपडे विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय होतो. मात्र, महिन्याची सुरुवात असल्याने आणि पगार, बोनस हातात येणे बाकी असल्याने अजून तरी दुकानांमध्ये ग्राहकांची फारशी गर्दी नसल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. मात्र, या आठवड्याच्या शेवटी खरेदीसाठी गर्दी होऊन चांगला व्यवसाय होईल, असा विश्वासही शहरातील कपडा विक्रेते यांनी व्यक्त केला. दिवाळीत मोठ्याप्रमाणात फटक्यांच्या आतषबाजी केली जाते. यासाठी शहरांतील तहसील कार्यालय पाठीमागे फूटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावले आहेत.
पायपुसण्यापासून पडद्यापर्यंत आणि पणतीपासून झुंबरापर्यंत खरेदीसाठी ग्राहम दुपारच्या वेळीही बाजारात उपस्थिती लावत आहेत. रांगोळी, सुकामेवा, विविध तोरणांनी, माळांनी झळाळी चढली आहे.अवघ्या शंभर रुपयांपासून चारशे-पाचशे रुपयांपर्यंत विविध प्रकारचे कंदील उपलब्ध आहेत. पारंपरिक कंदिलांसोबतच बांबू, वेतापासून बनवलेले कंदीलही लक्ष वेधून घेत आहेत.त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकार व प्रकारांतील कंदील, लायटिंगच्या माळा दाखल झाल्या आहेत. मोती, जर, मणी यांनी सजलेल्या पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीमध्ये मिठायांबरोबरच सुका मेव्याचीही देवाणघेवाण होते. सुकामेव्याचे रेडिमेड बॉक्स खरेदीसाठी ग्राहकांची पावले वळू लागली आहेत.