बारामती : पणदरे (ता.बारामती) येथील अहिल्यानगर (धुमाळवाडी) येथे जय भवानी तरुण मंडळाच्यावतीने ‘शारदीय नवरात्र व्याख्यानमाला २०२३’ चे अंतर्गत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१५ ऑक्टोबर ते दि.२४ ऑक्टोबर दरम्यान रोज रात्री ८ वाजता पार पडणार्या या महोत्सवाचा शुभारंभ घटस्थापनेदिवशी दि.१५ रोजी ‘वाचन संस्कृती’ या विषयावर महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या व्याख्यानाने होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र कोकरे यांनी दिली.
दि.१६ रोजी ‘माय लेकरांचा गोतावळा’ या विषयावर वाई येथील प्रसिद्ध व्याख्याते हिंदुराव गोळे मार्गदर्शन करणार असून यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार गणेश शिंदे, माळेगावचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दि.१७ रोजी सासकल येथील दत्तात्रय वारे यांचे ‘अजब जादूचे प्रयोग’ हा कार्यक्रम होणार असून सांगवी येथील विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे. दि.१८ रोजी जय तुळजाभवानी आराधी मंडळ, मानाजीनगरचे गायक शेखर काकडे यांचा ‘देवीचा जागर’ हा कार्यक्रम होणार असून साहित्य कट्टा, बारामतीचे पदाधिकारी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दि.१९ रोजी माऊली भारुड मंडळ, मलवडी यांचे सांप्रदायिक व समाज प्रबोधनपर तुफान विनोदी भारुड आयोजित केले असून संकल संत अध्यात्मिक व सामाजिक संस्था, फलटणचे पदाधिकारी व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे. दि.२० रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीच्या अधिकारी वर्गाच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्त्री शक्ती’ या विषयावर सौ.समृद्धी कोकरे अहिल्यानगर यांचे व्याख्यान होणार असून यावेळी ज्येष्ठ नागरिक सन्मान ,विधवा माता गौरव,गुणवंत कौतुक सोहळा पार पडणार आहे.
दि.२१ रोजी श्री संत सद्गुरु बाळूमामा सेवेकरी कारभारी, आदमापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दि.२२ रोजी ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ या मराठी वेब सिरीजमधील कलाकरांच्या प्रमुख उपस्थितीत नानासाहेब कोकरे यांच्या सौजन्याने महाप्रसादाचा कार्यक्रम. दि.२३ रोजी पंचक्रोशीतील सर्व महिला बचत गट समन्वयकांच्या प्रमुख उपस्थितीत नातेपुते येथील धनंजय माने यांचा चंदुकाका सराफ प्रस्तुत ‘होममिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम, तर दि.२४ रोजी पारंपारिक वाद्यवृंद कार्यक्रमाद्वारे ‘विजयादशमी’चा सण साजरा होणार आहे.
सदर महोत्सवाचे यंदा १०वे वर्ष असून या महोत्सव काळात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्मृतिप्रित्यर्थ दररोज वाचन प्रेरणा सोहळा व प्राणायम, योगासने होतील. रोज सकाळी व सायंकाळी ७ वाजता महाआरती हे कार्यक्रम पार पडणार असून पणदरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय भवानी तरुण मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.