फलटण प्रतिनिधी -
बिबी ता. फलटण येथे कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषीच्या विद्यार्थ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर माहितीपूर्ण व प्रभावी प्रात्यक्षिक केले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांना डाळिंबावर कीड नियंत्रणाचे आधुनिक व पर्यावरणपूरक उपाय प्रत्यक्ष दाखवून दिले.
या प्रात्यक्षिकेत लाइट ट्रॅप, चिकट सापळे, विषयुक्त रसायन, निंबोळी अर्क फवारणी अशा विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक करण्यात आले. कीड ओळख, फवारणीची अचूक वेळ, आणि सेंद्रिय उपायांचा शेतीत उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमात गावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशकांवरचा अवलंब कमी करून सेंद्रिय व एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे महत्त्व पटले. हे प्रात्यक्षिक कृषिदूत अनुष्क लोले, कार्तिक चौधरी, साहिल भिकले, कौस्तुभ शिपूरकर, ऋषी पाठक, आर्यन चौधरी व तुषार शिर्के यांनी सादर केले.