पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'महाराष्ट्राच्या विचार व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली अशी ओळख निर्माण केली. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन याचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास-संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं; अजित पवार
"ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ञ सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरीरीनं मांडणारं, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे
ओबीसी चळवळीची कधीही भरुन न निघणारी हानी झाली : छगन भुजबळ
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. ते आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या प्रा. नरके यांनी देशाच्या ओबीसी चळवळीत वैचारिक प्रबोधन करून समाजात जनजागृती करण्याचं मोठं काम केलं. तसेच मराठी साहित्य क्षेत्रातही मोलाचे कार्य केलं. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत त्यांनी संघटनेसाठी भरीव काम केलं आहे. त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे. आपल्या लेखनातून आणि भाषणांतून ओबीसींवरील अन्यायाविरोधात वाचा फोडणारा एक महत्त्वाचा आवाज आज हरपला आहे. भुजबळ परिवार व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा संपूर्ण परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना!, अशा शब्दांत छगन भुजबळांनी शोक व्यक्त केला आहे.