फलटण : २५५ फलटण - कोरेगाव (अ.जा.) विधान सभा मतदार संघातील मतदान बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वेळेत होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून, मतदान केंद्रावर येणाऱ्या स्त्री – पुरुष मतदारांसह दिव्यांग, वृध्द, तरुण वगैरे सर्व मतदारांना शिस्तीने, शांततेत, सुरक्षितेत मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
निवडणूक यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात फलटण तालुक्यातील पोलिस पाटील, महसूल मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कोतवाल वगैरे प्रशासन यंत्रणेला त्यांची जबाबदारी समजावून देत सतर्क राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले. त्यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निखिल मोरे, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान उपस्थित होते.
एकूण ३५५ मतदान केद्र सर्व व्यवस्थेसह सज्ज
या मतदार संघात शहरी भागात ४७ आणि ग्रामीण भागात ३०८ अशी एकूण ३५५ मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, प्रथमोपचार यंत्रणा, सुरळीत विद्युत पुरवठा, परिसर स्वच्छता, आवश्यक असेल त्या मतदारांना रिक्षा, व्हीलचेअर उपलब्ध करुन द्यावेत अशा सूचना देताना मतदानाच्या आदल्या दिवशी आपण या मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत त्यावेळी या सर्व सुविधा तेथे आहेत याची खात्री करा, त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता संबंधीत यंत्रणेकडून करुन घ्या अशा स्पष्ट सूचना यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
२३० मतदान केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे
एकूण मतदान केंद्रांपैकी २३० मतदान केंद्रांवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे कार्यान्वित राहणार असून गोखळी प्रा. शाळा व उत्तरेश्वर हायस्कूल ही २ मतदान केंद्रे महिला अधिकारी कर्मचारी आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण व शीलादेवी प्रा. शाळा कोळकी या २ मतदान केंद्रांवरील अधिकारी/कर्मचारी तरुण असल्याचे सांगण्यात आले आहे.
अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण
मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावरील केंद्र अधिकारी व त्यांचे सहकारी अन्य ४ कर्मचारी, १ शिपाई, १ पोलिस शिपाई किंवा गृहरक्षक दल जवान या सर्वांना त्यांच्या कामाचे स्वरुप, त्यांची जबाबदारी प्रशिक्षणादरम्यान समजावून देण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा प्रशिक्षित असल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केला आहे.
फलटण – कोरेगाव विधान सभा मतदार संघात १ लाख ७२ हजार ४५९ पुरुष, १ लाख ६५ हजार ९९१ स्त्रिया, १४ इतर असे एकूण ३ लाख ३८ हजार ४६४ मतदार असून ९९ टक्के पेक्षा अधिक मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट आहेत. एकूण मतदारांपैकी ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ४ हजार ८५२ मतदार आहेत. शासकीय अधिकारी/कर्मचारी असलेले २०२२ मतदार निवडणूक प्रक्रियेत सहभागी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी निदर्शनास आणून दिले आहे.