फलटण प्रतिनिधी - आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर व लातूर येथे मागील 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून, महाराष्ट्रातील धनगर जमातबांधवांच्या भावना तीव्र आहेत. येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी फलटण येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी भीमदेव बुरुंगले, शंकरराव माडकर, बजरंग खटके, बजरंग गावडे, रामभाऊ ढेकळे, तुकाराम शिंदे, महादेव पोकळे, बापूराव लोखंडे, खंडेराव सरक,सुखदेव बेलदार, दादासाहेब चोरमले,संजय ठोंबरे, विश्वासराव गावडे, विश्वासराव धायगुडे, ऋषिकेश काशीद, राजेंद्र धायगुडे, निलेश लांडगे, विजय भिसे, महादेव सोनवलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे. 1956 साली अनुसूचित जमातीच्या (SC/ST) यादीत 'धनगड' नावाची जमात दाखल करण्यात आली, ज्यामुळे धनगर जमात गेल्या 68 वर्षापासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून बंचित राहिला आहे. 'धनगड' नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक घडली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तर महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की, 'धनगड' जमात अस्तित्वात नाही, मात्र 'धनगर' जमात अस्तित्वात आहे. त्यामुळे, धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी प्रलंबित असल्याचे शेवटी म्हटले आहे.
मेंढरांचाही रास्तारोकोत सहभाग - धनगर सामाज बांधवानी नाना पाटील चौक फलटण येथे मेंढरे आणली होती.