फलटण प्रतिनिधी : फलटण येथील प्रख्यात
अस्थिशल्य चिकित्सक डॉ. प्रसाद जोशी यांना देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या इकॉनॉमिक टाइम्स पुरस्काराने ताज पॅलेस, दिल्ली येथील शानदार सोहळ्यात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, भरतनाट्यम नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी चित्रपट कलाकार अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज डॉ. जितेंद्र सिंग, केंद्रीय मंत्री डॉ. नंदिता अय्यर, सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर. डॉ. वंदना बग्गा, कुटुंब कल्याण संचालनालय कॅबिनेट मंत्री डॉ. अनुभुमनी रामदास, संध्या कोठारी, द्युती चंद, राष्ट्रीय विजेते आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त आणि गिगलिंगचे गुरू डॉ. मदन कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा हा राष्ट्रीय पुरस्कार भारतातील सर्वोच्च वैद्यकीय विचारांना, त्यांच्या निस्वार्थ समर्पणाबद्दल आणि त्यांच्या क्षेत्रातील वैद्यकीय उत्कृष्टतेच्या सीमा सतत पुन्हा परिभाषित करणाऱ्या देशातील अग्रगण्यांसाठी दिला जात असून या वर्षी डॉ. प्रसाद जोशी यांनी हा देश पातळीवरील सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार पटकावून आपल्या अस्थिशल्य चिकित्सा क्षेत्रातील ज्ञानावर शिक्कामोर्तब केले आहे. कार्यक्रमा दरम्यान टाइम्स नाऊतर्फे प्रेरणादायी ऑर्थोपेडिशियन भारत २०२४ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये गेल्या २४ वर्षांपासून फलटण सारख्या ग्रामीण भागात डॉ. प्रसाद जोशी यांनी जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या माध्यमातून फलटणसह शेजारच्या जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्राच्या विविध भागासह देश- परदेशातील अस्थिरुग्णांना दिलेल्या दर्जेदार वैद्यकीय सेवेचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या या वाटचालीची ठळक वैशिष्ट्ये त्यामध्ये नमूद आहेत.
सन २००९ मध्ये जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण येथे 'अभिनव एम आर आय MRI' या नावाने हिताची कंपनीचे ओपन एमआरआय युनिट सुरू करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना जे त्यावेळी कोठेही तालुकास्तरावर उपलब्ध नव्हते ते सर्वप्रथम फलटण येथे उपलब्ध झाले आणि आजपर्यंत सुमारे २० हजारावर रास्त दरात विविध एमआरआय स्कॅन करण्यात आले आहेत.
सन २०१२ मध्ये अल्ट्रा मॉड्यूलर जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरसह 7th एडिशन कॉम्प्युटर नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी (ब्रेन लॅब्स, जर्मनी) युनिट बसविण्यात आले व तालुका स्तरावर नेव्हिगेशन तंत्रज्ञान वापरणारे जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणचे त्यावेळी पहिले सेंटर होते.
कोविड लॉकडाउन कालावधीत डॉ. प्रसाद जोशी व त्यांच्या टीमने त्या ६ महिन्यांच्या कालावधीत नॉन कोविड रुग्णांच्या सुमारे ५०० शस्त्रक्रिया केल्या, कारण इतर सर्व हॉस्पिटल कोविड रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त होती.
दि. २५ मे २०२३ रोजी फलटण रोबोटिक्स सेंटर या नावाने जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी आवश्यक रोबोटिक तंत्रज्ञान युनिट सुरू केले. भारतात तालुका स्तरावरील हे पहिले रोबोटिक केंद्र असून गेल्या वर्षभरात या युनिट मध्ये सुमारे २०० गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया रास्त दरात करण्यात आल्या असून या प्रगत व परिपूर्ण तंत्रज्ञानामुळे सांधेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांना वेदना मुक्त आणि निरोगी जीवन जगण्यास मदत झाली आहे.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण येथे १ लाखाहून अधिक रुग्ण ओपीडीमध्ये तपासले आहेत. २० हजाराहून अधिक सामान्य आर्थोपेडिक आणि सुमारे ४ हजार सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कोणत्याही तालुका स्तरावरील हॉस्पिटलच्या तुलनेत ही संख्या निश्चित मोठी आहे.
येथे केवळ सातारा जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून, भारतातील अनेक राज्यातून अगदी परदेशातूनही येथे रुग्ण दाखल होत असतात. अमेरिकेतील एका रुग्णांवर नुकतीच सांधेरोपण शस्त्रक्रिया येथे करण्यात आली आहे.
डॉ. प्रसाद जोशी यांनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करताना आपल्या या क्षेत्रातील क्षमतेवर विश्वास ठेवून जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचे श्रेय असल्याचे आवर्जून सांगितले. आर्थोपेडिक सर्जन बनण्याची आणि फलटणसारख्या छोट्या गावात स्थायिक होण्याची, येथे कार्यकर्तृत्व दाखविण्याची संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानत या कार्यात आपले पालक, अर्धांगिनी डॉ. प्राची जोशी, कुटुंबीय आणि मनापासून साथ देणारे नातेवाईक, सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सहकाऱ्यांचे ऋण आपल्याला विसरता येणार नसल्याचे, हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची साथ मोलाची ठरल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी आवर्जून सांगितले.