फलटण प्रतिनिधि - २५५ फलटण - कोरेगांव (अ.जा.) विधानसभा मतदार संघातून संविधान समर्थन समिती व परिवर्तन महाशक्ती विकास आघाडीच्या वतीने प्रा. रमेश आढाव हे निवडणूक लढवीत आहेत. प्रा. रमेश आढाव यांना मत म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारला मत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नंदू मोरे यांनी म्हटले आहे. ते आज विडणी, पिंपरद, वाजेगाव, प्रचार दौऱ्यात बोलत होते.
फलटण - कोरेगांव विधानसभा मतदार संघातून संविधान समर्थन समितीच्या वतीने बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी याकरिता विविध पक्षांना भेटून उमेदवारीची मागणी केली होती. जवळपास सर्वच पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रस्थापित पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी पासून वंचित ठेवले. अखेर संविधान समर्थन समितीच्या वतीने बौद्ध समाजातील जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे प्रा. रमेश आढाव यांना उमेदवारीची घोषणा केली.
प्रा. रमेश आढाव हे गेली ३० वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत असे नंदू मोरे म्हणाले, त्यांना फलटण तालुक्यातील प्रश्नांची जाण असून विविधअंगी अभ्यास असणारे प्रा.आढाव हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा चेहरा असल्याचे नंदू मोरे यांनी म्हटले आहे.
महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच आजच्या पिढीला तारणारे आहेत. याच महामानवांच्या विचारांवर काम करणारे प्रा.आढाव हे व्यक्तिमत्व असून फलटणची संस्कृती पुन्हा एखादा निर्माण करण्यासाठी सुज्ञ मतदार रमेश आढाव यांनाच विधानसभेत पाठवतील याची खात्री असल्याचे शेवटी नंदू मोरे म्हणाले.