फलटण : महाराष्ट्र शासनाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महात्मा एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्ष तथा पत्रकार कृष्णाथ उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, समाज कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर सुमंत भांगे, तसेच समाज कल्याण आयुक्त आयुक्त ओम, प्रकाश बकोरिया आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, आमदार भरत गोगावले, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, ज्ञानेश्वर म्हात्रे या मान्यवरांच्या शुभहस्ते मुंबई येथील जमशेद भाभा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे सन्मानित करण्यात आला.
सन १९७१ - ७२ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र/समाजभूषण पुरस्कार योजना सुरु केली, तर सन १९८९ पासून अशा क्षेत्रात कार्यरत संस्थांना पुरस्कार देण्यात येतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी वगैरेंसाठी तसेच समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा, समाजसेवकांच्या कामाला दाद द्यावी, इतरांना अशा समाजोपयोगी कामांची प्रेरणा मिळावी यासाठी प्रत्येक वर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. त्यानुसार मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या ४ वर्षांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची निवड जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये फलटण शहरातील कृष्णाथ उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले हे गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अंध/अपंग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण, त्यांची निवास व्यवस्था, त्यांना लघु उद्योगाचे शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे राहता येईल किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध होतील यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनींना त्यांनी आपल्या या प्रयत्नातून उत्तम नागरिक घडविले आहे त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची सन २०२० - २१ या वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले जात आहे.