सचिन मोरे, फलटण.
हिंदी चित्रपटात एखाद्या खलनायकाचा अंत त्या चित्रपटातील हिरो अर्थात पोलीस अधिकारी "एन्काऊंट" करुन करतो असे अनेकदा आपण पहिले आहे. आज कदाचित तोच क्लायमॅक्स सीन... राजकीय पटलावर भारतीय जनता पार्टीच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांचा राजकीय एन्काऊंटर ? झाल्याचे बोलले जात आहे... असो याविषयी सविस्तर पाहू...
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आगामी लोकसभेसाठी भाजपने अब की बार 400 पार असा नारा दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची त्यावेळी लाट होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही जास्त जागा आणि मतांची टक्केवारी भाजपला मिळाली. 2014 मध्ये मतांची टक्केवारी 31 होती 2019 मध्ये ती वाढून 37 टक्के इतकी झाली. त्यामुळे आता 2024 ला भाजपने 400 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी काहीही करण्याची तयारी भाजपा कडून ठेवली जात असल्याचे बोलले जात आहे. देशातील वेगवेगळ्या स्थानिक राजकीय पक्षांची भारतीय जनता पार्टी कडून अक्षरशः चिरफाड करीत त्यांना पूर्ण हतबल केले जात असल्याचे दिसते आहे, त्यात महाराष्ट्र मागे असेल तर नवलंच. याच राजकीय कुटनीतीतून भाजपाने आपली वाटचाल काही महिन्यापासून सुरू ठेवली आहे. यामध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने त्यांचा युतीतील पक्ष शिवसेनेची दोन शकले केली. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो माजी कृषि मंत्री खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार व शरद पवार यांच्यात सापा - मुंगसाचे वैर करण्यास भाग पाडले आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा विनाअट विना उमेदवार भारतीय जनता पार्टी बरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये सहयोगी पक्ष म्हणून सहभागी असल्याचे बोलले जात आहे.
मला देशाचा पंतप्रधान व्हायचे आहे हे स्वप्न उराशी बाळगत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी आपली वेगळी छबी निर्माण केली व महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतात आपल्या कौशल्याने ओबीसी बरोबरच विविध जाती-धर्मातील युवकांना सामाजिक व राजकीय पटलावर जिंकले. पुढे महाराष्ट्रातील युती सरकार बरोबर एकत्र येत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग मंत्री झाले. जानकर यांना या काळात म्हणावा तसा कामाचा ठसा उमठवता आला नाही. पुढे नव्याने त्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले तर नाहीच परंतु आपण महायुती मधून बाहेर पडल्याचे स्वतः महादेवराव जानकर यांनी सातत्याने अनेक सभांमधून व माध्यमांसमोर जाहीर केले होते.
लोकसभा 2024 च्या अनुषंगाने महादेवराव जानकर यांनी पुन्हा एकदा आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून स्वबळाचा नारा देत परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तर याच काळात खासदार शरद पवार यांच्याबरोबर बैठका झाल्या व महाविकास आघाडी च्या माध्यमातून महादेवराव जानकर आता परभणी ऐवजी माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात लढणार असल्याच्या बातम्या झळकू लागल्या.
अशातच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील व महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे सर्वश्रुत असतानाच महादेवराव जानकर यांची उमेदवारी माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाला धोक्याची घंटा असल्याची चर्चा सुरु झाली आणि अबकी बार 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या गोटात खळबळ सुरु झाली.
वास्तविक 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार शरद पवार यांच्या विरोधात महादेवराव जानकर यांना तब्बल 98,946 म्हणजे 10.8 टक्के मतदान झाले होते. माढा मतदार संघात महादेवराव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे.याच मतदार संघात जानकर यांनी सामाजिक व राजकीय चळवळ उभी केली आहे. एकूणच महादेवराव जानकर हे ज्या धनगर समाजातून येतात तो धनगर समाज माढा मतदार संघात प्रामुख्याने मोठा मतदार आहे. त्याचा फायदा जानकर यांना नक्कीच झाला असता हे उघड आहे. त्यामुळेच भाजपाचे चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कौशल्याने महादेवराव जानकर यांच्याशी बैठक करीत त्यांना पुन्हा महायुतीत घेतले.
महादेवराव जानकर पुन्हा महायुतीत सहभागी झाल्यानंतर आता मात्र एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. महादेव जानकरच महायुतीचे बारामतीचे उमेदवार असतील. महादेव जानकरांनी २०१४ मध्ये सुप्रिया सुळेंविरोधात मिळविलेली साडे चार लाख मते ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते. तसेच अजित पवार यांना बारामतीतून घरातूनच होत असलेला विरोध पाहता. जर सुनेत्रा पवार पराभूत झाल्या तर ही नामुष्की पदरात पडू नये यासाठी अजित पवारही या उमेदवारीला पाठिंबा देऊ शकतात. त्या बदल्यात ते इतर मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेऊ शकतात. त्याचबरोबर परभणी या मतदार संघातून जानकर इच्छुक असल्याने तो पर्यायही महायुतीकडे आहे.
महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, रासप यांची विधानसभेतील ताकद एका आमदारापुरती आहे. एकही खासदार नाही. असं असले तरी या पक्षाचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक आपले स्थान आहे. त्याचं कारण जानकरांना धनगर समाजाचं मिळणारं मतदान. जी संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. आता रासप आणि जानकरांच्या नावामुळे धनगर मतं वळवण्याचा प्रयत्न महायुतीचा आहे. धनगर मताचं ध्रुवीकरण आपल्याला पहायला मिळेल. ध्रुवीकरणाचा अर्थ एकाच मतदार संघात त्यांचा प्रभाव आहे असे म्हणता येणार नाही. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर धनगर समाजाने एकी दाखवली ती महत्त्वाची आहे. काही मतदार संघात काही प्रमाणात धनगरांची अशी मते आहेत की ती मिळविल्याशिवाय एखाद्या उमेदवाराला विजयी होता येणार नाही. देशात जातीय जनगणनेची मागणी होत आहे. राजकारण्यांची गणितं या जातीय गणनेवर अवलंबून नसतात. त्यांची स्वतःची यंत्रणा असते. मतदार संघानिहाय, बुथनिहाय आकडेवारी त्यांच्याकडे असते. त्यानुसार महादेव जानकरांबाबतही असे गणित महायुती आणि मविआने मांडले असणार हे नक्की.
महायुती त्याचबरोबर महाविकास आघाडी या दोघांशी राजकीय समझोता करताना जानकर दिसले. तर महाविकास आघाडी कडून शरद पवारांनी माढा लोकसभा मतदार संघ जानकर यांना देत नवा राजकीय डाव टाकला होता ज्यामुळे जानकर दिल्लीत दिसले असते असे राजकीय विश्लेषक सांगतात. तर बारामती,परभणीसह राज्यात जानकरांच्या माध्यमातून भाजपाला शह देण्याचा डाव खेळण्याची संधी महाविकास आघाडीकडे होती. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विजयसिंह मोहिते - पाटील व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा महायुतीतून उमेदवारीला असलेला विरोध, माढा मतदार संघातील शरद पवार यांची ताकत व स्वतः महादेवराव जानकर यांचा माढा मतदार संघातील यापूर्वीचा अनुभव या सर्वांमुळे जानकर यांना करिष्मा करण्याची मोठी संधी असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. परंतु वर म्हटल्या प्रमाणे भाजपाचे चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कौशल्याने महादेवराव जानकर यांच्याशी बैठक करीत त्यांना पुन्हा महायुतीत घेतले खरे परंतु अगोदर महायुतीशी फारकत घेऊन पुन्हा त्यांच्या बरोबरच युती केल्याने महादेव जानकरांचा महायुतीकडून राजकीय एन्काऊंटर झाला असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत असून या निर्णयाचा परिणाम काय होईल हे लोकसभा निवडणूकीत दिसेलच.