सातारा, दि.7 : माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या विषयावर गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही, मतदार यादीतील तरुणाईचा टक्का वाढवावा म्हणून, आम्ही मतदान करणार कारण, हक्क वंचिताचे मार्ग मताधिकाराचा, शहरी मतदारांची अनास्था-कारणे आणि उपाययोजना या विषयांवर देखावे-सजावट करावे. त्याचबरोबर या विषयापलीकडे जाऊन मंडळांनी देखाव्यातून संदेश देता येईल. मात्र त्यामध्ये लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार यांचे महत्व अधारेखीत झाले पाहिजे.
मताधिकार हा 18 वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे, त्यासाठी प्रत्येक पात्र नागरीकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजाविणे, मतदार याद्यातील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मताधिकार बजावताना जात, धर्म पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे पैसे किंवा इतर अमिशांना बळी न पडता मताधिकार बजावणे यासारख्या विषयांवर गणेशोत्सव मंडळांनी देखावा-सजावटीतून जागृती करुन लोकशाही समद्ध करता येईल.
या स्पर्धेतील प्रथक क्रमांकास एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकास एकावन्न हजार, तृतीय क्रमांकास एकविस हजार व उत्तेजनार्थ दहा हजार रुपये बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळानी माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या स्पर्धेत सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.