पंढरपूर -
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाणं ( पंजाब ) या सुमारे 2,500 किलोमीटर रथयात्रा व सायकल वारीत भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भागवत धर्म प्रसारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी केले आहे.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमेटी घुमाणं व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी अशी सुमारे एक महिन्याची संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी काढण्यात येते. वारीचे हे पाचवे वर्ष आहे.
यंदा 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2026 अशी रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश अशा आठ राज्यातील सुमारे 50 मोठया शहरांतून व 500 पेक्षा अधिक ग्रामीण खेड्यातून ही अध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व निसर्गरम्य परिसराचे दर्शन घडविणारी सायकल वारी काढली जाते. या सायकल वारीच्या माध्यमातून शांती, समता, बंधुता या संत विचारांचा प्रचार व प्रसार केला जातो. तसेच पर्यावरणाचा संदेश दिला जातो . या सायकल वारी मध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जातं नाही. सायकल यात्रींना दोन टी शर्ट, दररोज चहा, नास्ता, भोजन व निवास व्यवस्था मोफत पुरविण्यात येते. अधिक माहितीसाठी भागवत धर्म प्रसारक मंडळ, सुमित्रा प्लाझा, वेळापूर ता माळशिरस जि सोलापूर मो. 9822023564 या कार्यालयाशी 30 सप्टेंबर पूर्वी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी असे आवाहन भिसे यांनी केले आहे.

















