फलटण : अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आरक्षणाच्या अ, ब, क, ड अशा उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी फलटण येथे गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी ‘संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध समाजबांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे उपवर्गीकरण झाल्यास विद्यमान आरक्षणाचे विभाजन होऊन त्याचा परिणाम विविध घटक जातींवर होऊ शकतो, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे. विशेषतः शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रोजगार आणि पुढील पिढीच्या संधींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणात फूट पडून १३ टक्के आरक्षणाचे विविध भाग होतील आणि त्याचा आरक्षणाच्या लाभावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे समाजबांधवांनी वेळेत जागरूक होऊन संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ येथे झालेल्या बैठकीत अनुसूचित जातीतील विविध घटक समाजांच्या प्रमुखांनी मोर्चात आपापला समाज ताकदीने सहभागी होणार असल्याचे एकमताने जाहीर केले. यामध्ये बौद्ध, चर्मकार, हिंदू खाटीक, बुरुड, हिंदू ढोर, होलार, वाल्मिकी-मेहतर-रुखी आदी समाजांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.
मोर्चाची माहिती
दिनांक : गुरुवार, १० सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी १०:३० वाजता
प्रारंभ : मंगळवार पेठ समाज मंदिर
मार्ग : मंगळवार पेठ → बारामती चौक → प्रांत कार्यालय, फलटण












