माळजाई मंदिरात येणारे भाविक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सुपुत्र कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ करण्यात आलेली ही भेट त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करणारी ठरणार आहे
फलटण प्रतिनिधी :
माळजाई मंदिर येथे येणारे भाविक, चिल्ड्रन पार्कमध्ये खेळण्यासाठी येणारी लहान मुले, शहरातील नागरिक तसेच प्रशासकीय कामानिमित्त फलटणमध्ये येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ, थंड व फिल्टर केलेले पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून फलटण येथील उद्योजक संजय दुधाळ यांनी आपले सुपुत्र कै. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरासाठी वॉटर कुलर भेट दिला आहे.
माळजाई मंदिर परिसर हा भाविकांसह शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे व विश्रांतीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. अनेक नागरिक या परिसरात विश्रांतीसाठी येतात, तर काही जण कामानिमित्त शहरात आल्यानंतर जेवणाचा डबा घेऊन येथे भोजनासाठी थांबतात. अशा नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने संजय दुधाळ यांनी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद व समाजोपयोगी आहे.
या वॉटर कुलरचे पूजन व माळजाई मंदिर परिसराला समर्पण करण्याचा कार्यक्रम शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता माळजाई मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. संजय दुधाळ यांच्या हस्ते हा वॉटर कुलर समर्पित करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे माळजाई मंदिरात येणारे भाविक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सुपुत्र कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ करण्यात आलेली ही भेट त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करणारी ठरणार आहे.
या कार्यक्रमास सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ फलटण व माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.


















