वैद्यकीय व्यवसाय हा केवळ व्यवसाय न मानता त्याला सेवाभावाची जोड देत सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. सुभाष गुळवे यांची फलटण शहरात विशेष ओळख निर्माण झाली आहे. ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, त्यांच्या आजवरच्या कार्याचा आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आवर्जून उल्लेख होत आहे.
फलटण येथील एक प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक म्हणून डॉ. गुळवे यांनी प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि सेवाभाव ही आपल्या व्यवसायाची प्रमुख मूल्ये जपली आहेत. रुग्णांशी आपुलकीने संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि गरजेच्या वेळी मदतीसाठी तत्पर राहणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण मानला जातो.
वारीत सेवा, समाजासाठी समर्पण
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी फलटण येथे वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम डॉ. गुळवे सातत्याने राबवितात. हजारो वारकरी भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच खरी विठ्ठलसेवा मानून ते आपले वैद्यकीय ज्ञान समाजाच्या उपयोगी आणतात.
वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक असूनही सामाजिक बांधिलकी जपण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘माणूस म्हणून माणसाच्या उपयोगी पडणे’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.
रामोशी समाजाचे आदर्श व्यक्तिमत्त्व
रामोशी समाजाच्या सामाजिक प्रगतीसाठी सातत्याने पुढाकार घेणारे आणि समाजातील प्रश्नांसाठी ठामपणे भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. सुभाष गुळवे यांच्याकडे पाहिले जाते. समाजातील युवकांनी शिक्षण घ्यावे, विविध क्षेत्रांत पुढे जावे आणि आपल्या कर्तृत्वातून समाजाची ओळख निर्माण करावी, यासाठी ते सातत्याने प्रोत्साहन देतात.
समाजातील कोणत्याही व्यक्तीला अडचण आली तर ‘आपला माणूस’ या भावनेने मदतीला धावून जाणे, हा त्यांच्या स्वभावातील महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळेच समाजात त्यांच्याबद्दल आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
राजकीय क्षेत्रातही विश्वासाचे नाते
डॉ. सुभाष गुळवे यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचालही उल्लेखनीय आहे. माजी खासदार कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या विचारांशी आणि कार्याशी नाते जोडत त्यांनी सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली.
त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर सेलचे फलटण शहराध्यक्ष म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांना संघटित करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांत ते सक्रिय सहभाग घेत आहेत. फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू आणि खास सहकारी म्हणूनही डॉ. गुळवे यांची ओळख आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना व्यक्तीपेक्षा विचार, विकास आणि समाजहिताला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका दिसून येते.
सुशिक्षित संस्कारांचा वारसा
डॉ. सुभाष गुळवे यांचे कुटुंब मूळचे नारायणगाव, जिल्हा पुणे येथील. व्यवसायाच्या निमित्ताने गुळवे कुटुंब फलटण येथे स्थायिक झाले. त्यांच्या कुटुंबाला शिक्षण आणि सामाजिक जाणीवांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यांचे वडील शिरूर येथे एस.टी. महामंडळात वर्ग-२ अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते शेती व्यवसायाकडे वळले. आई प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे आजोबा विस्ताराधिकारी, तर आजी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. कुटुंबातील मामांपैकी एकजण प्राध्यापक असून दुसरे मामा सहारा सिटी येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सौ.मालती याही उच्चशिक्षित आहेत. तर त्यांची दोन्हीही मुले तेजल आणि सतेज यांचे सध्या शिक्षण सुरु आहे.
अशा सुशिक्षित आणि संस्कारक्षम वातावरणात डॉ. गुळवे यांचे व्यक्तिमत्त्व घडले. यशामागे माणुसकीचा पाया वैद्यकीय व्यवसाय, सामाजिक कार्य, समाजासाठीची बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनातील सक्रिय सहभाग या सर्वांचा समतोल साधताना डॉ. सुभाष गुळवे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्यासाठी धावून जाण्याची वृत्ती. प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष मदतीला महत्त्व देणाऱ्या त्यांच्या या स्वभावामुळे अनेकांच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
४ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करताना एकच अपेक्षा व्यक्त करता येईल त्यांच्या हातून वैद्यकीय सेवा, सामाजिक कार्य आणि समाजहिताची ही वाटचाल यापुढेही अशीच अखंड सुरू राहो.
डॉ. सुभाष गुळवे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश आणि समाजसेवेची अखंड ऊर्जा लाभो, हीच मनापासून सदिच्छा!
धैर्य टाईम्स परिवार

















