फलटण प्रतिनिधी –
शहरातील फळ विक्रेते, भाजी विक्रेते तसेच विविध चौकांमध्ये व्यवसाय करणाऱ्या फिरत्या हातगाडेधारकांना फलटण नगरपरिषदेकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक विक्रेते दिवसभराचा व्यवसाय संपल्यानंतर शिल्लक राहिलेला माल जागेवरच ठेवून जात असल्याचे तसेच काही हातगाडेधारक सायंकाळी हातगाडे घरी न नेता रस्त्याच्या कडेला उभे करून ठेवत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी आग किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रस्त्यावर ठेवलेला माल व हातगाडे अडथळा ठरत असून आपत्कालीन यंत्रणांना काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानण्यात आला आहे.
त्यामुळे शहरातील सर्व फळ व भाजी विक्रेते तसेच हातगाडेधारकांनी कोणत्याही परिस्थितीत शिल्लक माल रस्त्यालगत किंवा रस्त्यावर ठेवू नये तसेच व्यवसायानंतर हातगाडे संबंधित ठिकाणाहून हटवावेत, अशा सूचना नगरपरिषदेकडून देण्यात आल्या आहेत.
या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित माल व हातगाडे जप्त करण्यात येणार असून त्यातून होणाऱ्या नुकसानीस संबंधित मालक स्वतः जबाबदार राहील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सर्व विक्रेते व हातगाडेधारकांनी या नियमांचे पालन करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

















