फलटण प्रतिनिधी :
फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत 'जॉईंट किलर' ठरलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या अटीतटीच्या लढतीत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना अवघ्या 11 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यांच्या या निसटत्या पराभवापेक्षा त्यांनी दिलेल्या जोरदार लढतीचीच चर्चा सध्या फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
फलटण तालुका गेल्या काही काळापासून राजकीय परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे. तब्बल ३२ वर्षांहून अधिक काळ राजे गटाचे राजकीय वर्चस्व असलेल्या तालुक्यातील बहुतांश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांवर आजही राजे गटाचे प्राबल्य असल्याचे मानले जाते. असे असतानाही समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या पारंपरिक राजकीय वर्चस्वाला आव्हान देत अवघ्या 11 मतांनी पराभव पत्करला.
विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मिळवलेल्या यशानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. विजय हुकला असला तरी अत्यंत कमी मतांच्या फरकाने झालेला हा पराभव त्यांच्या राजकीय संघर्षाची आणि वाढत्या प्रभावाची साक्ष देणारा ठरत असल्याची चर्चा आहे.
निवडणुकीत विजय मिळवणे महत्त्वाचे असतेच; मात्र प्रस्थापित राजकीय सत्ताकेंद्राला अवघ्या 11 मतांनी रोखण्याची ताकद दाखवणेही तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची तालुक्यात 'संघर्ष नायक' म्हणून चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात फलटणच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे आकाराला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















