रोबोट तंत्रज्ञानाच्या आधारे सांधेरोपण शस्त्रक्रिया केलेले विविध वयोगटातील ७५० रुग्णांनी आपली फलटण मॅरेथॉन २०२६ मध्ये सहभागी होऊन ३ कि. मी. अंतर चालण्याची स्पर्धा पूर्ण केली हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य मानले जात आहे.
फलटण प्रतिनिधी :
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या माध्यमातून सलग १० वर्षे आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करुन डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी केवळ फलटण नव्हे तर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची असून अलीकडे या माध्यमातून निसर्ग संरक्षण आणि अवयव दान या चळवळीचे महत्त्वही समाजाला पटवून देत त्यामध्ये सहभाग वाढविण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट करीत डॉक्टर दाम्पत्यास धन्यवाद दिले.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्यावतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चे पारितोषिक वितरण सोहोळ्यात अध्यक्षस्थानावरुन रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, अभिनेते समीर धर्माधिकारी व सौ. अपर्णा धर्माधिकारी, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, आ. सचिन पाटील, प्रा. श्याम जोशी, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी, ह.भ.प. केशव महाराज जाधव, ह.भ.प. एस. एम. घाडगे यांच्यासह विविध वयोगटातील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवी आरोग्यावर होणाऱ्या आघातांमुळे आणि चुकीच्या मानवी सवयींमुळे अनेक आजार वाढत असताना आपला आहार, विहार सुधारण्याबरोबर त्याला नियमित व्यायामाची जोड दिल्याने आरोग्य उत्तम राहील याची ग्वाही डॉ. जोशी यांनी फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीद्वारे दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतानाच सर्व वयोगटातील नागरिकांनी आपल्या शरीर प्रकृतीला उपयुक्त ठरतील असे व्यायाम नियमित करुन आपले आरोग्य अबाधीत राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
अवयवदान ही अत्यंत उपयुक्त आणि मनाला समाधान देणारी बाब असून ज्या अवयवांच्या आधारे आपले संपूर्ण जीवन सुखी समाधानी आणि आनंदी जगता आले, ते अवयव इतरांना दान करुन त्यांच्या जीवनात सुख समाधान निर्माण करण्याची संकल्पना अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी असून मानवाला या जगातून कधीतरी जावे लागणार आहे, मात्र जातानाही इतरांना समाधान देणारी ही संकल्पना प्रत्येकाने स्वीकारुन आपले अवयव निकामी झाल्याने दुःखी असलेल्यांच्या जीवनात सुख निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने अवयव दान करावे असे आवाहन करतानाच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या कार्यक्रमातच स्वतःचा अवयवदानाचा फॉर्म ऑनलाईन भरुन देत फलटणकरांसमोर एक नवा आदर्श ठेवला.
शहरवासीयांचे आरोग्य विशेषतः हाडे, स्नायू मजबुत राहतील यासाठी योग्य ती दक्षता घेत आ. सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील अंतर्गत रस्त्यांसह शहराला जोडणारे मुख्यरस्ते सिमेंट काँक्रीटचे केल्याने आरामदायी व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे हाडे व स्नायूंच्या तक्रारी निश्चित कमी होतील मात्र त्यामुळे, आपल्याकडे (जोशी हॉस्पिटल प्रा. लि.) येणारी रुग्ण संख्या कमी होईल त्यासाठी क्षमा करण्याची विनंती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी डॉ. प्रसाद जोशी यांना केली.
सलग १० वर्षे आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करुन केवळ फलटणकरांना नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला नियमित चालणे आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी झालेल्या डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतानाच या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या स्पर्धकांना ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धन्यवाद दिले आणि या उपक्रमात यशस्वी झालेल्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या माध्यमातून आयोजित आपली फलटण मॅरेथॉनच्या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल फलटणकरांना धन्यवाद देतानाच या उपक्रमात सहभागी झाल्याने आपल्याला शरीर प्रकृती उत्तम राखण्याचे महत्त्व आणि त्यातून नियमित व्यायामाची आवश्यकता स्पष्ट झाली असल्याने आगामी काळात नियमित व्यायाम करण्याबरोबरच आपली फलटण मॅरेथॉनमध्ये पुन्हा सहभागी होण्याचे आश्वासन देतानाच गेली सलग १० वर्षे हा उपक्रम अखंडित सुरु ठेवण्यात आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात डॉ. प्रसाद जोशी यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे प्रख्यात अभिनेते समीर धर्माधिकारी यांनी आवर्जून सांगितले.
फलटण शहरात स्वातंत्र्यपूर्वकाळापासून नियमित व्यायाम आणि खेळाला प्राधान्य दिल्याचे निदर्शनास आणून देत येथे बॅडमिंटन आणि टेनिस या खेळाची दर्जेदार साधने, सुविधा पूर्वीपासून उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या मोठी आहे तसेच येथे खो - खो या देशी खेळालाही संस्थान काळापासून प्राधान्य दिले गेले, आजही या खेळात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू फलटणचे नाव उंचावत असल्याचे निदर्शनास आणून देत नियमित व्यायाम आणि खेळ हा फलटणकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे निदर्शनास आणून देत त्याला पुढे नेण्याचे काम डॉ. प्रसाद जोशी यांनी आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून हाती घेतल्याबद्दल श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक केले. मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेल्या फलटण व महाराष्ट्रातील स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले.
आ. सचिन पाटील यांनी आपण शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने आपल्याला शेतातील विविध कामाद्वारे नियमित व्यायामाची सवय असल्याने आपली शरीर प्रकृती सतत निरोगी आणि सुदृढ राखण्याची संधी लाभल्याचे निदर्शनास आणून देत फळबागेतील झाडे आणि त्यावरील फळांना कीटकनाशक औषध फवारण्यासाठी आपण सलग ७ तास पाठीवर पंप घेऊन चालण्याचा व्यायाम यापूर्वी नियमित केल्याचे आवर्जून सांगितले. डॉ. प्रसाद जोशी यांनी अलीकडे नियमित व्यायाम आणि वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच जलस्त्रोतांचे बळकटीकरण या क्षेत्रात सुरु केलेले काम कौतुकास्पद असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना आ. सचिन पाटील यांनी धन्यवाद दिले.
प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात आपली फलटण मॅरेथॉनचा इतिहास कथन करताना पहिल्या वर्षी केवळ २०० ते २५० स्पर्धकांना घेऊन सुरु झालेली आपली फलटण मॅरेथॉन आज २ ते २ हजार ५०० स्पर्धकांच्या सहभागाने यशस्वी होत असताना लोकांमध्ये आरोग्य आणि त्यासाठी व्यायामाचे महत्त्व रुजविण्यात यशस्वी झाल्याचे समाधान लाभल्याचे स्पष्ट करताना वाढती रुग्णसंख्या आणि त्याची कारणे शोधताना व्यायामाचा अभाव स्पष्ट झाल्यानेच आपण मॅरेथॉनची सुरुवात केली, आज दशकपूर्ती होत असताना त्यामध्ये वाढता सहभाग आणि नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचे समाधान ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी आवर्जून सांगितले.
२१ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये १५० पुरुष व ५० महिला असे एकूण २००, १० कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये ३०० पुरुष व १०० महिला अशा एकूण ४००, ५ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये २५० पुरुष व १५० महिला अशा एकूण ४००, ३ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये (Fun run) ३०० पुरुष व २०० महिला अशा एकूण ५००, ३ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये (Walkethon) ६५ वर्षावरील ३०० पुरुष व २०० महिला अशा ५००, असे एकूण २००० स्पर्धक मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी विविध विभागात पहिले ३ यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. प्रत्येक विभागात पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे ७ हजार रुपये आणि तिसरे ५ हजार रुपये अशी एकूण ७२ बक्षिसे देण्यात आली. ही सर्व बक्षीस यशस्वी स्पर्धकांना ऑनलाइन वितरित करण्यात आली असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी यावेळी सांगितले.
ह.भ.प. नवनाथ कोलवडकर आणि अमृता पंडित यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार प्रदर्शन डॉ. सौ. प्राची जोशी यांनी केले.
आपली फलटण मॅरेथॉन मध्ये राज्याच्या विविध भागातून विविध वयोगटातील स्पर्धक सहभागी होत असतात त्यामध्ये दै. ऐक्य, साताराचे व्यवस्थापक सुरेश चिंचकर तथा भाऊ (वय ७३) आणि साताऱ्यातील प्रख्यात मराठा खानावळचे गणपतराव मोहिते (वय ८४) यांचा समावेश आहे. हे दोघे गेल्या पाच वर्षापासून आपली फलटण मॅरेथॉन मध्ये सहभागी होत आहेत.

















