फलटण :
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यायामाची सवय लागावी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनचा दशकपूर्ती सोहळा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन, फलटण येथे होणार आहे.
यंदाच्या मॅरेथॉनची थीम ‘Run for Health & Happiness’ अशी आहे. जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आरोग्य आणि अवयवदानाचा संदेश देत ज्येष्ठ, तरुण आणि बालकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मॅरेथॉनमध्ये २१ किमी, १० किमी आणि ५ किमी अंतराच्या शर्यतींचा समावेश असून, १२ वर्षांवरील सहभागींसाठी ३ किमी Fun Runची यंदा नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किमी Walkethonचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी रोबोटिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची ३ किमी Walkethon आयोजित करण्यात येणार असून, ही देशातील अशा प्रकारची पहिली Walkethon असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मॅरेथॉनचा मार्ग ऊसाच्या बागा आणि द्राक्षमळ्यांमधून जाणारा नयनरम्य असणार आहे. सहभागींसाठी मार्गावर हायड्रेशनची सुविधा, प्री-रन झुंबा वॉर्मअप तसेच पोस्ट-रन मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मॅरेथॉन रनरला आकर्षक टी-शर्ट, टाइम चिपसह बिब, कॅप, एनर्जी बार आणि सरप्राईज गिफ्ट असलेले मॅरेथॉन किट देण्यात येणार आहे.
१८ ते ३०, ३१ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ ते ६४ वर्षे अशा चार वयोगटांमध्ये २१, १० आणि ५ किमी शर्यती घेण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील पुरुष व महिला धावपटूंसाठी स्वतंत्र पारितोषिके असून प्रथम क्रमांकासाठी १० हजार, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. एकूण ६० पारितोषिके दिली जाणार आहेत.
मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू होऊन ३० सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पुरुषांसाठी नोंदणी शुल्क ₹७५० + कर, महिलांसाठी ₹५०० + कर, तर ३ किमी Fun Run साठी ₹३०० शुल्क आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किमी Walkethon विनाशुल्क आहे.
२५ ऑक्टोबरला सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन येथे सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी, डॉ. प्राची प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.


















