फलटण : सचिन मोरे
फलटण तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला असताना तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तालुक्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आगामी काळात दुष्काळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत फलटण शहरात भाजपच्या एका नेत्याकडून फेस्टिव्हलच्या नावाखाली लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याने या आयोजनावरून टीकेची झोड उठू लागली आहे.
एका बाजूला पाण्यासाठी शेतकरी आणि जनावरांचा टाहो, तर दुसऱ्या बाजूला फेस्टिव्हलच्या माध्यमातून घुंगरांचा खणखणाट! या विरोधाभासामुळे दुष्काळग्रस्त जनतेच्या भावनांची जाणीव आयोजकांना आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची चिंता वाढत असताना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना त्यांच्या अडचणींना प्राधान्य देण्याऐवजी मनोरंजनाच्या कार्यक्रमांना महत्त्व दिले जात असल्याची टीका होत आहे.
फेस्टिव्हलच्या माध्यमातून लावण्यांचे आयोजन करण्यास विरोध असण्यापेक्षा, दुष्काळग्रस्त परिस्थितीत अशा कार्यक्रमांचे औचित्य काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जनतेच्या मूलभूत गरजा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी जनतेच्या परिस्थितीचे भान ठेवणे अपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर फलटणच्या राजकीय वर्तुळात ‘अजब तुझे सरकार... देवेंद्रजी, अजब तुझे सरकार!’ असा उपरोधिक सूर उमटू लागला आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या हौसेला प्राधान्य दिले जात असल्याची टीका या निमित्ताने केली जात आहे.
दुष्काळग्रस्तांच्या वेदना समजून घेऊन पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होणार की मनोरंजनाचे कार्यक्रमच गाजणार? हा प्रश्न आता फलटण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.


















