प्रतिनिधी प्रतिनिधी :
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला दिलेला राजकीय पाठिंबा मागे घेत असल्याची जाहीर घोषणा ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी पत्रकार परिषदेत केली. यापुढे भाजपशी कोणताही राजकीय संबंध राहणार नसून, आपली स्वतंत्र सामाजिक व राजकीय वाटचाल कायम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपला पाठिंबा देताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणाला चालना मिळावी आणि युवकांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी, हा आपला उद्देश होता, असे ॲड. खरात यांनी सांगितले. मात्र, या अपेक्षांची पूर्तता होताना दिसत नसल्याने जनहिताला प्राधान्य देत पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण भाजपच्या अधिकृत सभासद नसून पक्षात अधिकृत प्रवेशही केलेला नव्हता, असे सांगत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला पाठिंबा आता पूर्णपणे मागे घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापुढे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध लढा देणे तसेच महिला, विद्यार्थी, युवक आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्य करणे सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. आपले सामाजिक व राजकीय कार्य कोणत्याही पक्षाच्या किंवा सत्तेच्या चौकटीपुरते मर्यादित नसून, जनतेचा विश्वास आणि लोककल्याण हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसह आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदार, समर्थक आणि हितचिंतकांना आवाहन केले. भाजपला असलेला आपला पाठिंबा संपुष्टात आला असून, कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता उमेदवाराची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा, जनतेप्रती बांधिलकी आणि लोकहिताची भूमिका विचारात घेऊन विवेकाने मतदान करावे, असे त्यांनी म्हटले.
“माझी राजकीय वाटचाल सत्तेसाठी नव्हे, तर जनतेच्या हक्कांसाठी आहे. जनतेचा विश्वास हीच माझी ताकद आणि जनसेवा हेच माझे ध्येय आहे,” अशी भूमिका ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी मांडली.

















