सातारा दि. 6 : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शिष्यवृत्ती/शिक्षण फी परिक्षा फी या योजनेचे विजाभज ,इमाव व विमाप्र प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण (Renewal) अर्ज व नवीन अर्ज नोंदणी 31 जुलै 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली आहे.
जिल्हयातील काही महाविदयालयात उशीरा प्रवेश होणे, उशीरा निकाल लागणे इ. कारणांमुळे ब-याच विदयार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. विदयार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये म्हणून अदयाप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विदयार्थ्यांसाठी शासनाने मुदत वाढ दिलेली आहे. विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी सातारा जिल्हयातील पात्र विदयार्थ्यांनी सन २०२१-२२ शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन महाविदयालयांकडे सादर करावेत तसेच अर्ज संबंधित महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे पडताळणी करून सादर करावेत.
महाविदयालयांनी अर्ज भरण्याची सुविधा महाविदयालयातच उपलब्ध करून दयावी. तसेच जिल्हयातील सर्व महाविदयालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. महाविदयालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे वर्ग करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.