फलटण प्रतिनिधी :
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे गुरुवार, दि. ३० जुलै रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली 'रस्ता सुरक्षा अभियान' हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. एन. एम. गायकवाड होत्या. यावेळी उपप्राचार्य पी. डी. घनवट तसेच प्रमुख पाहुण्या मोटार वाहन निरीक्षक सौ. रेणुका राठोड उपस्थित होत्या.
सौ. रेणुका राठोड यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगताना वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वाहन परवाना, नो पार्किंग नियम, सुरक्षित ओव्हरटेक, यू-टर्नची योग्य पद्धत, वाहतूक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, रेडियमचा वापर तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन केले. तसेच रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्याचे महत्त्व आणि मोटार वाहन कायद्यातील कलम १८३ ते १९० बाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
उपप्राचार्य पी. डी. घनवट यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वाहनाचा वेग मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले. भरधाव वेगामुळे अपघात होऊन गंभीर दुखापत किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका वाढत असल्याने सुरक्षित वाहनचालना ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रा. पी. व्ही. साळुंखे, सौ. मेटकरी मॅडम, ए. एस. तांबोळी, जे. ए. नाळे, जी. बी. वाघ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डी. डी. सस्ते यांनी केले.










