फलटण, दि. 6 जून –
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही भूमिका मांडली.
सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या फलटण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरच वक्तव्य करायला हवे होते. संबंधित पोस्ट ही हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली नसून ती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर (एक्स) हँडलवरील पोस्ट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, आमदारांनी ज्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे ते निवडून आले, त्या स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात अथवा घातपाताच्या चौकशीची मागणी अद्याप विधानसभेत का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याबाबत आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
फलटण शहर व तालुक्यातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे सांगत, निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यावर आमदारांनी भर द्यावा, असे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. शहरातून सुरू असलेल्या पालखी महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत नुकत्याच घडलेल्या वीज खांब कोसळण्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी टीका केली. या घटनेतील जखमींची विचारपूसही आमदारांनी केल्याचे दिसून आले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, शेतकरी आणि बेरोजगार युवकांचे प्रश्न याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत, अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेल्या वक्तव्यामुळे आमदारांनी आपला राजकीय अपरिपक्वपणा दाखवून दिल्याची टीका सूर्यवंशी यांनी केली. अखेरीस, आमदारांच्या वक्तव्याचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.










