फलटण प्रतिनिधी :
तालुक्यातील धुळदेव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवडीच्या ठरावात श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक गणेशराव धायगुडे यांच्या नावाचा ठराव ८ विरुद्ध ५ अशा बहुमताने मंजूर करण्यात आला.
एकूण १३ संचालक मंडळापैकी ८ संचालकांनी गणेशराव धायगुडे यांना मतदान केले आहे तर ५ मते ही श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना मिळाली आहेत.
श्रीमंत अनिकेतराजेंना पुन्हा राजकीय पराभव
फलटण नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, आता जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा राजकीय दणका बसला आहे. राजे गटाकडून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाचा ठराव मांडण्यात आला होता. मात्र, संचालक मंडळाने धायगुडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
धुळदेव सोसायटीच्या या निकालामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेशराव धायगुडे यांच्या निवडीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या सह भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विविध पदाधिकारी व सर्व संचालक व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.










