फलटण प्रतिनिधी,:
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी सेंटर, फलटण यांच्या वतीने माध्यमिक व ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षकांसाठी ‘Master AI Training’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड एन. एम. व उपप्राचार्य श्री. घनवट पी. डी. यांच्या हस्ते डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी सेंटरचे प्रमुख श्री. शेखर कांबळे, सौ. मनीषा कांबळे व तंत्रस्नेही शिक्षिका कु. साक्षी भिवरकर यांचा वृक्षरोप व संस्थेची दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणाचा उद्देश शिक्षकांनी आपल्या दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे, हा होता.
प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना ChatGPT, Suno AI आणि MagicSchool.ai या विविध AI साधनांची सविस्तर माहिती देण्यात आली. सौ. मनीषा कांबळे, श्री. शेखर कांबळे व कु. साक्षी भिवरकर यांनी साध्या व सोप्या भाषेत AI चा शैक्षणिक क्षेत्रातील वापर समजावून सांगत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविली.
AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक मनोरंजक, सुलभ आणि प्रभावी करता येऊ शकते, हे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी शिक्षकांना AI सर्टिफिकेट देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. तगारे एस. एम. यांनी केले.










