फलटण :
मौजमजा करण्यासाठी घरातील सोन्याचे दागिने विश्वासघाताने घेऊन त्यांचा अपहार करून विक्री करणाऱ्या चार आरोपींसह सोने खरेदी करणाऱ्या सोनाराला फलटण शहर पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी सोन्याचे दागिने, दुचाकी, रोख रक्कम आणि आयफोन असा एकूण ९ लाख ३३ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, प्रज्ञा गणेश अहिवळे यांनी त्यांच्या घरातील सुमारे ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अल्पवयीन मुलगी, मुलीचा मित्र आदित्य कांबळे व सिद्धार्थ अहिवळे यांनी विश्वासघाताने घेऊन अपहार केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार फलटण शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींची माहिती मिळवून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी संगनमत करून अपहार केलेले सोन्याचे दागिने बारामती येथील मित्र रुद्र ऊर्फ शिरीष मंगेश सुकुलकर याच्यामार्फत बारामतीतील सोने-चांदी खरेदी करणारे तुषार जितेंद्र शहाणे यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी सिद्धार्थ संतोष अहिवळे (वय २२, रा. सोमवार पेठ, फलटण), आदित्य विनोद कांबळे (वय १८, रा. दत्तनगर, फलटण), रुद्र ऊर्फ शिरीष मंगेश सुकुलकर (वय २६, रा. हुंबेवस्ती, कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि तुषार जितेंद्र शहाणे (वय २३, व्यवसाय सोने-चांदी खरेदी, रा. ऋतुराज अपार्टमेंट, टीसी कॉलेज मागे, बारामती, जि. पुणे) यांना अटक केली आहे.
आरोपींकडून ५ लाख ६३ हजार ८०९ रुपये किमतीची सोन्याची गळ्यातील गोळी, २ लाख २२ हजार रुपयांची काळ्या रंगाची यामाहा कंपनीची एमटी-१५ मॉडेलची दुचाकी, १ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ४८ हजार रुपयांचा आयफोन असा एकूण ९ लाख ३३ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. गजेंद्र गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनशाम बनलाक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार पुनम वाघ करीत आहेत.
















