फलटण प्रतिनिधी :
विडणी (ता. फलटण) येथील २४ फाटा परिसरात शेतातून घरी जात असलेल्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने लुटणाऱ्या संशयित आरोपीला फलटण ग्रामीण पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विडणी गावच्या हद्दीतील २४ फाटा येथे संबंधित महिला शेतातील काम आटोपून घरी जात होती. निर्मनुष्य ठिकाणाचा फायदा घेत आरोपी उसातून पळत येऊन महिलेचा पाठलाग करू लागला. त्यानंतर तिच्या डोळ्यात चटणी टाकून गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने काढून घेऊन तो पसार झाला.
या घटनेची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन तपास पथके तयार केली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी विडणी गावातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने चोरी केल्याचे नाकारून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला तपासासाठी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अधिक चौकशीदरम्यान केरळ येथे फिरायला जाण्यासाठी पैशांची गरज असल्याने चोरी केल्याचे आरोपीने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे व अविनाश शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

















