फलटण :
संस्थेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी AI चे प्रशिक्षण घेऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी केले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे माजी अध्यक्ष कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ ‘काका’ यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेच्या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कै. काकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कै. काकांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त दि. १८ ते २१ ऑगस्टदरम्यान रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी, AI प्रशिक्षण तसेच क्रीडा, वक्तृत्व, निबंध, रांगोळी व चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी कै. काकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी AI प्रशिक्षण घेऊन त्याचा सकारात्मक व शैक्षणिक उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
फलटण ब्लड बँकेच्या वतीने सौ. वेणूताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिरात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) उपस्थित होते. क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संस्थेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तणावरहित वातावरण मिळावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी वेदांत बनकर व कु. अनुष्का साळुंखे यांनी कै. काकांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्राचार्या सौ. गायकवाड एन. एम., प्राचार्या सौ. सुरवसे व्ही. के., प्रभारी प्राचार्या सौ. रायते टी. व्ही., उपप्राचार्य घनवट पी. डी., शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तगारे एस. एम. यांनी केले, तर आभार प्रा. कु. सस्ते आर. एस. यांनी मानले.
















