फलटण, दि. ६ ऑगस्ट :
आगामी नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील सर्व व्यापारी व दुकानदारांना चायनीज तसेच नायलॉन मांजाची विक्री न करण्याचे आवाहन फलटण नगरपरिषदेने केले आहे.
नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, नागपंचमीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. यासाठी वापरला जाणारा चायनीज व नायलॉन मांजा नागरिकांसह पक्षी व प्राण्यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे शहरातील दुकानदार, गोदामधारक व घरामधून पतंग व मांजाची विक्री करणाऱ्यांनी चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करू नये. या सूचनेकडे दुर्लक्ष करून अशा मांजाची विक्री केल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यासह अपघात झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.
ही सूचना मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी जारी केली असून, सर्व व्यापाऱ्यांनी याची नोंद घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










