फलटण प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील सकल धनगर समाज व मेंढपाळ आर्मी संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी तसेच मेंढपाळ बांधवांवरील वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतूद करून त्यांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 जुलै 2014 रोजी बारामती येथे आंदोलनादरम्यान धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाला 29 जुलै 2026 रोजी बारा वर्षे पूर्ण होऊनही आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. सरकारने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच मेंढपाळ बांधवांवरील वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी विशेष कायदेशीर संरक्षण द्यावे, चाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा तसेच वन विभागाच्या क्षेत्रात नियंत्रित स्वरूपात जनावरे चरण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी युवा नेते निवृत्ती खताळ (सर), तानाजी जगताप, नितीन सुळ, ज्येष्ठ मार्गदर्शक कालिदास चोरमले, माजी सरपंच आप्पा तात्या लोखंडे, प्रेम मोरे (बहुजन पक्ष, फलटण तालुका अध्यक्ष), ह.भ.प. हरी महाराज गोपनर (मेंढपाळ आर्मी प्रवक्ते), रमेशभाऊ तांबे (मेंढपाळ आर्मी जिल्हाध्यक्ष), किसनराव सोनवलकर (आबा), रत्नाकर क्षीरसागर, प्रमोद शिंदे (राष्ट्रीय मानव अधिकार व बाल संरक्षण परिषद, पुणे जिल्हाध्यक्ष), गणेश कुंभार, सुरेश झेंडे, सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे शेंडगे, महादेव शेळके (आबा), सुनील शिंदे, रोहिदास ठोंबरे, सचिन ठोंबरे, संतोष येळे, पोपट सुळ, बाबू तांबे, मुगटराव येळे, संतोष सुळ यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.










