फलटण प्रतिनीधी:- दाखल्यांसाठी फलटण तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. दाखले प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रवेश प्रक्रियेसह विविध परीक्षांचे अर्ज भरताना विद्यार्थी, उमेदवारांसह पालकांचा व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल महिलांचा जीव मेटाकुटीला येत असल्याचे चित्र आहे.
फलटण तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय याठिकाणी प्रलंबित दाखल्यांची संख्या सर्वाधिक आहे १ जुलै २०२४ ते १० जुलै २०२४ अखेर सुमारे ६००० ते ७००० हजार सर्व प्रकारचे दाखले प्रलंबीत असल्याची माहिती मिळत आहे. दररोज दाखल होणार्या दाखल्यांच्या तुलनेत निर्गतीचे प्रमाण कमी आहे. यामुळे दाखला वेळेत मिळावा यासाठी अनेकांना वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत धाव घ्यावी लागत आहे.
फलटण तालुक्यातील जून व जुलै महिन्यात दाखल्यांची दाखल करण्याची संख्या अधिक आहे. वेळेत दाखले सोडली जात नसल्याने दाखल्यांच्या निर्गतीला विलंब होत आहे. दाखले प्रलंबीत राहत असल्याने दाखल्यांसाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांवर यावी, हे दुर्दैवीच आहे. याबाबत दैनंदिन नियोजन झाल्यास दाखल्याची निर्गत वेगाने होईल आणि दाखला वेळेवर मिळण्यास मदत होईल.
दाखल झालेली तारीख, ते पुढच्या स्वाक्षरीसाठी सोडलेली तारीख आणि अंतिम स्वाक्षरी झालेली तारीख यानुसार गेल्या काही महिन्यातील दाखल्यांची माहिती घेतली तर दाखल्यांसाठी केला होणारा विलंब स्पष्ट होईल. प्रवेश घेताना, नोकरीचे अर्ज भरताना अनेक विद्यार्थी, उमेदवारांना तसेच विविध योजना खास करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करीता दाखल्यांसाठी हेलपाटे मारायला लागत आहे.
तालुक्यांतील काही महा-ई-सेवा केंद्रातून सादर केलेले दाखले वेळेत पुढे जातात आणि स्वाक्षरी होऊन ते मिळतात. मात्र, अन्य केंद्रांतून दाखल झालेले दाखले कित्येक दिवस एकाच टेबलवर असतात. वारंवार आठवण करून दिल्यानंतर हेलपाटे मारायला लावल्यानंतर हे दाखले पुढे सोडले जातात, असेही चित्र आहे.१ जुलै २०२४ ते १० जुलै २०२४ अखेर सुमारे ६००० ते ७००० हजार प्रलंबित असणारे दाखले कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.