सातारा दि. 20: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
इ.9 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती. इ.5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते 10वी मधील अनुसूचित जातीच्या विदयार्थिनीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आदी योजनांचा समावेश आहे.
या योजनांचे संदर्भात सातारा जिल्हयातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानीत, विना अनुदानीत कायमस्वरुपी अनुदानीत शाळेतील मुख्याध्यापक यांनी https://prematric.mahait.org/Login/Login या महाडीबीटी प्रणाली वेब लिंकवर आपल्या शाळेची नोंदणी करावी. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील वर नमूद केलेल्या योजनांचे अनुसूचित जातीमधील सर्व पात्र विदयार्थ्यांचे अर्जाची महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करावी.