फलटण शहरातील गणेशोत्सव शांततेत, उत्साहात संपन्न होत असताना शहरातील विसर्जन मिरवणूकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरु असल्याचे फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. ते प्रशासनातील महसूल, वीज वितरण, नगर परिषद, पाटबंधारे वगैरे खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग, विसर्जन ठिकाणे यांची प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, अतिरिक्त तहसीलदार राऊत, वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक शेळके, वीज वितरण कंपनी, पाटबंधारे खाते, नगर परिषद वगैरे विभागाचे अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड, आरोग्य व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी विनोद जाधव यांनी शहरातील रस्त्याचे खड्डे बुजविण्यात आल्याचे, तसेच रस्त्याकडेची वाहतुकीला व वीज वाहक तारांच्या दृष्टीने अडथळ्याची ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याचे, गणेश विसर्जन ठिकाणी नीरा उजवा कालवा व अन्य ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था व विसर्जनासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.
वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांनी विसर्जन मार्गावरील वीज वाहक तारा व ट्रान्सफॉर्मर सेंटर्स मुळे कोठेही धोकादायक स्थिती राहणार नाही याची दक्षता घेत योग्य संरक्षक व्यवस्था करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी संपूर्ण मिरवणूक मार्ग आणि विसर्जन ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात येणार असून त्याशिवाय फिरती पोलिस पथके संपूर्ण शहर व मिरवणूक मार्गावर कार्यान्वित राहुन कायदा सुव्यवस्था परिस्थितीवर लक्ष ठेवून गरज वाटल्यास योग्य उपाय योजना करतील याची ग्वाही दिली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मिरवणुका शिस्तबद्ध, शांततेत लवकर सुरु कराव्यात, आपल्या मार्गाने अन्य मिरवणुका जाणार असल्याने कोणत्या एकाध्या चौकात अधिक वेळ न थांबता सर्वांना संधी मिळेल आणि शहर वासियांना सर्व मिरवणुकांमधील देखावे पाहता येतील यासाठी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी केले आहे.
आगामी २/३ दिवसात सर्व विभागांनी आपली कामे पूर्ण करुन त्याचा अहवाल आपल्याकडे पाठवावा म्हणजे पुन्हा एकदा पाहणी करुन संपूर्ण व्यवस्था उत्तम झाल्याची खात्री करुन घेता येईल अशी अपेक्षा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केली आहे.