सातारा दि. 2 : प्रत्येक मागासवर्गीय व्यक्तीस शिक्षण, सेवा, निवडणूक व इतर संविधानिक लाभ आरक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करून घेताना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. अनेकदा मागासवर्गीय व्यक्तीस पालकांमधील अज्ञान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे विहीत कालावधीत जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित रहावे लागते. याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दि. 01 एप्रिल ते दि. 30 एप्रिल 2023 पर्यंत समता पर्व घोषित करुन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा या कार्यालयामार्फ़त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सातारा येथे मुख्य सभागृहामध्ये दि. 01 एप्रिल 2023 रोजी उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती स्वाती इथापे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नितिन उबाळे व पोलिस उपधिक्षक, पोलिस दक्षता पथक अनिल गुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये “मंडणगड पॅटर्न” या संकल्पनेनुसार इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकणा-या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेमध्येच मिळणेबाबत व 11 वी व 12 वी विज्ञानमध्ये शिकणा-या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी सातारा यांचेद्वारे विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 03 एप्रिल 2023 रोजी समिती कार्यालयामध्ये जाती पडताळणी कामी शालेय व महसुली पुराव्यांचे अभिलेख पडताळणी शिबीर, दि. 06 एप्रिल 2023 रोजी समिती कार्यालयामध्ये विद्यार्थी विषयक प्रकरणांचे विशेष त्रुटीपुर्तता शिबीर व दि. 14 एप्रिल 2023 रोजी तयार वैधता प्रमाणपत्रांचे प्रत्यक्ष वाटप कार्यक्रम शिबीर आयोजित केले आहे.
या समता पर्व 2023 च्या अनुषंगाने चालु वर्षात 12 वी शास्त्र अभ्यासक्रमात शिकणा-या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समितीस जात पडताळणी साठी अर्ज केला आहे, परंतू अदयाप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, अथवा ज्या विद्यार्थ्यांचे प्रकरण त्रुटीयुक्त आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा या कार्यालयात दि. 06 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यापुर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहुन त्रृटीपुर्तता करावी. असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य स्वाती इथापे, यांनी केले आहे.
















