सातारा दि. 13 :- महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार 9 सप्टेंबर 2023 रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एस. अडकर, यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यावेळी सर्व पॅनल प्रमुख न्यायीक अधिकारी, सदस्य, कर्मचारी, विधी स्वयंसेवक, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, पक्षकार व पोलीस उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकूण 11 हजार 114 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 2 हजार 838 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. यात एकूण 23 कोटी 30 लाख 4 हजार 574 रुपयांची वसूली करण्यात आली. वादपूर्व 977 प्रकरणांपैकी 3 हजार 838 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. तर वादपूर्व प्रकरणांमध्ये 3 कोटी 77 लाख 55 हजार 198 रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली. या लोक अदालतीमध्ये एकूण 6 हजार 676 प्रकरणे निकाली निघाली. दि. 4 ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्ह मध्ये सातारा जिल्ह्यात एकूण 906 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई ची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वटल्याची प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपू्र्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बँकाची कर्ज, दुरध्वनी व विद्युत देयके, ग्रामपंचायत मालमत्ता, पाणीपट्टी कर वसुली प्रकरणे, इत्यादी प्रकरणांचा समावेश होता.
जिल्ह्याच्या ठिकाणी एकूण 6 आणि तालुका न्यायालयात एकूण 29 पॅनल करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनलवर एक विधिज्ञ पॅनल सदस्य म्हणून काम पाहत होते. लोकअदालत यशस्वी होण्याकरीता पक्षकार, सदस्य, सर्व न्यायीक अधिकारी, पोलीस, बेलिफ, विधीस्वयंसेवक, आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती नितीन जाधव यांनी सांगितले.